‘त्या’ ११ अर्जदारांना पुन्हा संधी; संक्रमण गाळे वाटपासाठी म्हाडाच्या समितीची सुनावणी

संक्रमण गाळे वाटपासाठी ११ अर्जदारांची पात्रता निश्चित करून गाळे वाटप करण्यासाठी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने गठित केलेल्या तटस्थ समितीने ६ मार्च रोजी दुसरी सुनावणी आयोजित केली होती.
‘त्या’ ११ अर्जदारांना पुन्हा संधी; संक्रमण गाळे वाटपासाठी म्हाडाच्या समितीची सुनावणी
Published on

मुंबई : संक्रमण गाळे वाटपासाठी ११ अर्जदारांची पात्रता निश्चित करून गाळे वाटप करण्यासाठी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने गठित केलेल्या तटस्थ समितीने ६ मार्च रोजी दुसरी सुनावणी आयोजित केली होती. मात्र, या सुनावणीला ११ पैकी प्रत्यक्ष दोनच अर्जदार उपस्थित राहिले. त्यामुळे नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने संबंधित अर्जदारांना पुन्हा एकदा अंतिम संधी देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

२१ मार्चला अर्जदारांची तिसरी सुनावणी होणार आहे. यावेळी सर्व अर्जदारांनी मंडळाने निर्धारित केलेल्या आवश्यक कागदपत्रांसह स्वतः प्रत्यक्ष सुनावणीस हजर राहण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. ६ मार्च रोजी झालेल्या समितीच्या दुसऱ्या सुनावणीदरम्यान वर्षा मिठबावकर, गुलाब सिंह हे दोनच अर्जदार हजर राहिले. मात्र, पात्रतेसंबंधी त्यांनी कोणतेही कागदपत्र समितीसमोर सादर केले नाहीत. दरम्यान, या प्रकरणी गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी समितीतर्फे पहिलीसुनावणी घेण्यात आली. या सुनावणीला एकही अर्जदार उपस्थित राहिला नाही.

...नंतरच संक्रमण गाळे वाटपासंबंधी निर्णय

अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या अनुषंगाने, समिती, पात्रता निश्चिती करून संक्रमण गाळे वाटपासंबंधीचा तपशीलवार अहवाल सादर करणार आहे. सदर समिती गठित झाल्यामुळे याबाबतचा अहवाल लवकरच प्राप्त होणार असून ११ अर्जदारांची पात्रता निश्चित झाल्यानंतरच संक्रमण गाळे वाटपासंबंधी उचित निर्णय घेण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in