

मुंबईतील कंटेंट क्रिएटर टीना सोनी हिच्यासाठी एपी ढिल्लोंचा बहुचर्चित कॉन्सर्ट एन्जॉय करण्याचा क्षण भीतीदायक अनुभवात बदलला. इंस्टाग्रामवर ४१ हजारांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या टीना हिने आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे.
कॉन्सर्टचा आनंद भीतीत बदलला
शुक्रवार, २६ डिसेंबर रोजी टीना आणि तिची मैत्रीण बांद्रा स्टेशनवरून जिओ कन्व्हेन्शन सेंटरकडे जाण्यासाठी ऑटो रिक्षातून प्रवास करत होत्या. सुरुवातीला सगळं ठीक वाटत असतानाच, प्रवासादरम्यान अचानक ऑटोचालकाने रिक्षा रस्त्यात थांबवली आणि "तुम्ही मोठ्याने बोलत आहात" असा आरोप करत दोघींनाही खाली उतरण्यास सांगितले.
इतक्यावरच न थांबता, गंतव्यस्थानी न पोहोचताच ऑटोचालकाने भाड्याची मागणी केली. आम्ही पोहोचल्यानंतर पैसे देऊ, असं शांतपणे सांगितल्यावर ऑटोचालक आक्रमक झाला, शिवीगाळ करू लागला आणि मारहाणीची धमकी देऊ लागला. "इथेच लोक बोलावून तुम्हाला मारून टाकीन," अशा शब्दांत त्याने दहशत निर्माण केल्याचा आरोप टीना हिने केला आहे.
व्हिडीओ रेकॉर्डिंगनंतर परिस्थिती अधिक गंभीर
स्वतःच्या सुरक्षेसाठी टीना हिने मोबाईलवर व्हिडीओ शूटिंग सुरू करताच परिस्थिती आणखी बिघडली. ऑटोचालकाने रिक्षा थेट तिच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने तो पळून गेला, मात्र पुन्हा परत येऊन धमकावून निघून गेला. विशेष म्हणजे, ट्रॅफिक पोलीस आसपास असतानाही हा प्रकार घडल्याचं टीना हिने नमूद केलं आहे.
'पटक पटक के मारुंगा' - व्हिडीओत धमकी स्पष्ट
या व्हिडीओमध्ये ऑटोचालक 'पटक पटक के मारुंगा' अशा धमकीच्या भाषेत बोलताना स्पष्ट ऐकू येतो. या प्रकारानंतर टीना आणि तिच्या मैत्रीणीने तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली, व्हिडीओ पुरावा सादर केला आणि ऑटोचालकाविरोधात तक्रार दाखल केली.
यानंतरच्या पोस्टमध्ये टीना सोनी हिने आणखी एक धक्कादायक बाब समोर आणली. "हा प्रकार मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या भागात बांद्रा या ठिकाणी घडला. तरीही एकही व्यक्ती आमच्या मदतीला पुढे आली नाही," असं सांगत तिने लोकांनी मदत न केल्याबद्दलची नाराजी व्यक्त केली.
आपला अनुभव शेअर करण्यामागचा उद्देश कोणालाही घाबरवणं नसून, अशा घटना कुठेही आणि कधीही घडू शकतात, याची जाणीव करून देणं असल्याचं टीना हिने स्पष्ट केलं आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणणाऱ्या या घटनेने सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.