

भारतीय संगीतविश्वातील दिग्गज गायिका आशा भोसले यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली आहे. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून, वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी १००० हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
वाहतूक नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना
लोअर परळ येथील निवासस्थानापासून दादरमधील शिवाजी पार्कपर्यंत होणाऱ्या अंत्ययात्रेदरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. अनेक मार्गांवर वाहतूक वळवण्यात आली असून, संभाव्य गर्दी लक्षात घेता अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पार्थिव नेणारे वाहन फुलांनी सजवले
आशा भोसले यांचे पार्थिव नेण्यासाठी तयार करण्यात आलेले वाहन पांढऱ्या फुलांनी सजवण्यात आले आहे. त्यांच्या स्मृतींना आदरांजली म्हणून ही विशेष सजावट करण्यात आली आहे.
शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
दादर येथील स्व. भागोजी बाळूजी कीर हिंदू स्मशानभूमीत आज सायंकाळी ४ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी लोअर परळ येथील त्यांच्या निवासस्थानी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले होते.
मान्यवरांची उपस्थिती
अंत्यदर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर चाहत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. उद्धव ठाकरे कुटुंबीयांसह, मुंबईच्या महापौर ऋतु तावडे, सचिन तेंडुलकर, रितेश देशमुख, ए. आर. रहमान यांसारख्या अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
आशा भोसले यांच्या निधनामुळे देशभरातून शोक व्यक्त केला जात असून, त्यांच्या अंतिम यात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे.