

भारतीय संगीतविश्वाला आपल्या सुरांनी मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना सोमवारी (दि. १३) अखेरचा निरोप देण्यात आला. आठ दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा त्यांचा अमर आवाज आज कायमचा शांत झाला. त्यांच्या पार्थिवावर दादर येथील स्व. भागोजी बाळूजी कीर हिंदू स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
१२ एप्रिल रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती खालावल्याने त्यांना शनिवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिशय थकवा आणि छातीच्या संसर्गामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान मल्टी-ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांची प्राणज्योत मालवली.
शासकीय इतमामात अखेरचा निरोप
आशा भोसले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी लोअर परेल येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांना अभिवादन करण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी उसळली होती. राज्य सरकारतर्फे त्यांना पूर्ण शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली.
फुलांनी सजवलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली आणि शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी पोलिस दलातर्फे हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना अखेरची सलामी देण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्क स्मशानभूमीत हजेरी लावून आशाताईंना अखेरचा निरोप दिला. राजकीय क्षेत्रातून उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, आशिष शेलार यांसह अनेक नेत्यांनीही उपस्थित राहून त्यांना आदरांजली वाहिली.
अंत्यदर्शनासाठी अभिनेता आमिर खान, विकी कौशल, गायक अनु मलिक यांच्यासह अभिनेत्री तब्बू, आशा पारेख, अभिनेता रितेश देशमुख, गायक सुदेश भोसले, अभिनेते राकेश रोशन, नीना गुप्ता यांसह अनेक कलाकार उपस्थित होते. त्यांनी आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
अष्टपैलू गायकीचा सुवर्णकाळ
अनेक दशकांच्या कारकीर्दीत आशा भोसले यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला असंख्य अजरामर गाणी दिली. “दिल चीज क्या है”, “पिया तू अब तो आजा”, “मेरा कुछ सामान” आणि “चुरा लिया है तुमने” यांसारख्या गाण्यांनी त्यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.
भारतीय संगीताच्या इतिहासात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या दिग्गज गायिकेला पद्मविभूषण आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.