

मुंबई : साक्षात स्वर्गातून पृथ्वीवर अवतरलेल्या गंगेप्रमाणे, कधी उत्फुल्ल, कधी एखाद्या तरुणीसारखे अवखळ, कधी मातेसारखे वत्सल आणि कधी धीरगंभीर आध्यात्मिक असे रूप धारण करणाऱ्या स्वरगंगेचा खळाळ स्तब्ध झाला आहे. गेली सात दशके, भारतीयांच्या किमान तीन पिढ्या आणि जगभरच्या लक्षावधी चाहत्यांना अविरतपणे रिझवणारा आवाज काळाच्या पडद्याआड गेला आहे.
ज्या गळ्यातून उमटू शकत नाही असा एकही सूर नाही आणि जिथे त्या चैतन्य निर्माण करू शकत नाहीत अशी एकही मैफिल नाही असे ज्यांच्याविषयी म्हटले गेले त्या चिरतरुण आवाजाच्या व व्यक्तिमत्त्वाच्या स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांनी रविवारी मुंबईत शेवटचा श्वास घेतला. त्या ९२ वर्षांच्या होत्या. शनिवारी अत्याधिक थकवा आणि छातीतील संसर्गामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. पण त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश येऊ शकले नाही. सर्व अवयव निकामी झाल्याने त्यांचं निधन झाले असे डॉक्टरांनी स्पष्ट केलं.
आपले वडील मास्टर दीनानाथ यांच्याकडून तेजतर्रार ताना आणि गळ्यातील जबरदस्त फिरत असा सांगीतिक वारसा उचललेल्या आशाताईंचे आरंभीचे आयुष्य अत्यंत कष्टमय होते. त्यातच त्यांनी भोसल्यांशी विवाह केल्याने त्या मंगेशकर कुटुंबातून बाहेर पडल्यासारख्या झाल्या. चित्रपटसृष्टीत लता मंगेशकरांच्या लोकप्रियतेशी तीव्र स्पर्धा करावी लागली.. पण पुढील दोन दशकात त्यावर मात करून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायनाच्या क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले. आरंभी केवळ कॅब्रे किंवा उडत्या चालीतील गीते वाट्याला आली. पण ओपी नय्यर आणि आरडी बर्मन या संगीतकारांनी त्यांच्या कारकीर्दीला नवी दिशा दिली.
गेल्या सत्तर वर्षांमध्ये सी. रामचंद्र ते ए.आर. रहमान अशा संगीतकारांसोबत त्यांनी काम केले. त्यांच्या अष्टपैलू व चिततरुण गायकीने अगदी अलीकडच्या काळातील तरुणाईवरही त्यांच्या गाण्यांनी गारूड केले. मराठीत त्यांनी दत्ता डावजेकर, सुधीर फडके, वसंत प्रभू, वसंत पवार, अनिल अरूण यांच्यापासून ते अगदी अलिकडच्या नवख्या संगीतकारांबरोबर काम केले. चित्रपटसंगीताबरोबरच मराठी भावसंगीत तसेच नाट्यसंगीत यामध्ये त्यांनी स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवला. विशेषतः बंधू हृदयनाथ मंगेशकर यांच्या अनवट व अवघड चाली त्यांनी लीलया गळ्यातून उतरवून सर्वांना थक्क केले.
आज अंत्यसंस्कार
आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज (सोमवार) दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल, अशी माहिती आनंद भोसले यांनी दिली. तर सकाळी ११ ते २ दरम्यान लोअर परळ इथल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेता येईल.
अखेरची जाहीर उपस्थिती
आशाताई या जवळपास अखेरपर्यंत कार्यमग्न होत्या. पाच मार्चला सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्या विवाहानिमित्त मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलात स्वागत समारंभ झाला. त्यावेळी आशाताई हजर होत्या.
छायाचित्रकारांना त्यांनी थांबून फोटोही काढू दिले. सार्वजनिक ठिकाणी त्यांचे झालेले ते अखेरचे दर्शन ठरले.