

पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवर आजपासून (दि. २२) इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोल पूर्णपणे माफ करण्यात आला आहे. त्यामुळे हजारो ईव्ही वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.
एप्रिल महिन्यात जाहीर झालेल्या महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणाअंतर्गत हा निर्णय अंमलात आला आहे. वाहतूक क्षेत्रातील कार्बन उत्सर्जन आणि इंधनाचा वापर कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अटल सेतू हा या धोरणाखाली टोलमाफी लागू होणारा पहिला मार्ग ठरला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरही अशीच सवलत लागू होण्याची शक्यता आहे.
कोणत्या वाहनांना मिळणार लाभ?
खासगी आणि प्रवासी वापरासाठी असलेल्या हलक्या चारचाकी इलेक्ट्रिक गाड्या
इलेक्ट्रिक बसेस
राज्य परिवहन (एसटी) व अन्य शहरी परिवहन उपक्रमांच्या बसेस
मात्र, मालवाहतूक करणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना या सवलतीतून वगळण्यात आले आहे. याशिवाय, राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर इलेक्ट्रिक चारचाकींना आधीच ५० टक्के टोलसवलत देण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबईतील वाढता ईव्ही ताफा
सध्या मुंबईत एकूण २२,४०० नोंदणीकृत ईव्ही आहेत. त्यामध्ये १८,४०० हलकी चारचाकी वाहने, २,५०० लहान प्रवासी वाहने, १,२०० जड प्रवासी वाहने आणि ३०० मध्यम प्रवासी वाहने आहेत. अटल सेतूवर दररोज सरासरी ६०,००० वाहने धावतात. त्यापैकी ३४ ते ४० हजार वाहने नियमितपणे सेतूचा वापर करतात. त्यामुळे या टोलमाफीचा प्रत्यक्ष लाभ मोठ्या प्रमाणात मिळणार आहे.
इतक्या पैशांची होणार बचत
राज्यभरात ईव्हीची वाढणार मागणी
सरकारने स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर काही निवडक मार्गांवरील ईव्हींसाठी टोलमाफीची घोषणा केली होती. वाढते इंधनदर आणि पर्यावरणीय प्रश्न लक्षात घेता, इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देणे हा या निर्णयामागचा हेतू असल्याचे प्रशासनाने सांगितले. अधिकाऱ्यांच्या मते, यामुळे राज्यभरात ईव्ही स्वीकारण्याचा वेग वाढेल आणि स्वच्छ, शाश्वत वाहतुकीकडे वाटचाल होईल.