दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी BESTची विशेष व्यवस्था; अतिरिक्त बसेस, फ्रंट-डोअर एंट्रीसह खास सुविधा

परीक्षेच्या काळात गरजेनुसार जादा बससेवा चालवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी BESTची विशेष व्यवस्था; अतिरिक्त बसेस, फ्रंट-डोअर एंट्रीसह खास सुविधा
Published on

येत्या काही दिवसांत सुरू होणाऱ्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित, सोयीस्कर आणि वेळेत होण्यासाठी बेस्ट (BEST) उपक्रमाने विशेष तयारी केली आहे. परीक्षेच्या काळात गरजेनुसार जादा बससेवा चालवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.

बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान होणार आहे. या काळात मुंबईभर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची धावपळ होणार असल्याने, बेस्ट प्रशासनाने सर्व डेपो व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रकांना विशेष सूचना दिल्या आहेत.

बस निरीक्षक व कर्मचारी तैनात

माहितीनुसार, विद्यार्थी तसेच पालकांकडून आलेल्या विनंत्या, प्रत्यक्ष गर्दीची परिस्थिती तसेच वाहतुकीची स्थिती लक्षात घेऊन आवश्यक त्या ठिकाणी तातडीने अतिरिक्त बसेस चालवण्यात येणार आहेत. यासाठी विभाग नियंत्रकांकडून सतत आढावा घेतला जाणार आहे. तसेच महत्त्वाच्या चौकात, बसस्थानकांवर आणि गर्दीच्या मार्गांवर बस निरीक्षक व कर्मचारी तैनात असणार असून, बससेवा सुरळीत राहावी आणि बसला उशीर होऊ नये यासाठी ते देखरेख करणार आहेत.

पुढच्या दारातून बसमध्ये एंट्री

परीक्षेच्या काळात सर्व बसचालक, वाहक, निरीक्षक आणि बस स्टार्टर यांना विद्यार्थ्यांशी नम्रतेने वागण्याच्या, आवश्यक माहिती व मार्गदर्शन देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी त्यांना पुढच्या दारातून बसमध्ये प्रवेशाची परवानगी देण्यात येणार असून, त्यामुळे गर्दी कमी होऊन चढ-उताराची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.

विद्यार्थ्यांचा प्रवास तणावमुक्त होणार

दररोज हजारो विद्यार्थी परीक्षा केंद्रांकडे प्रवास करणार असल्याने, बेस्टच्या या विशेष योजनेमुळे विद्यार्थ्यांचा प्रवास वेगवान, अडथळामुक्त आणि तणावमुक्त होण्यास मदत होणार आहे. जादा बससेवेमुळे वेळेत परीक्षा केंद्रावर पोहचण्याची खात्री वाढून, विद्यार्थ्यांचा परीक्षेचा तणावही कमी होईल, असा विश्वास बेस्ट (BEST) प्रशासनाने व्यक्त केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in