मुंबईत 'भारत टॅक्सी' ॲप सुरू; कसं वापरायचं, काय आहेत खास फीचर्स? जाणून घ्या

प्रत्यक्ष कॅब बुकिंग सेवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मुंबईत 'भारत टॅक्सी' ॲप सुरू; कसे वापराल? जाणून घ्या फीचर्स
मुंबईत 'भारत टॅक्सी' ॲप सुरू; कसे वापराल? जाणून घ्या फीचर्स
Published on

मुंबईतील प्रवाशांसाठी शहरात प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. केंद्र सरकारचे 'भारत टॅक्सी' हे राईड-हेलिंग (Ride-Hailing) ॲप आता मुंबईत अधिकृतपणे सुरू करण्यात आले असून प्रवासी आणि चालकांसाठी ॲप डाउनलोड व रजिस्ट्रेशनसाठी सुरु करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्ष कॅब बुकिंग सेवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कांदिवलीत सेवेला सुरुवात

कांदिवली (पश्चिम) येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी ही योजना केवळ तांत्रिक सुविधा नसून चालकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा महत्त्वाचा उपक्रम असल्याचे सांगितले.

उबर आणि रॅपिडोला स्पर्धा

'भारत टॅक्सी' ॲप मुंबईत उबर आणि रॅपिडोसारख्या खासगी ॲग्रिगेटर (Aggregator) प्लॅटफॉर्मना थेट स्पर्धा देणार आहे. या ॲपद्वारे प्रवाशांना इलेक्ट्रिक ऑटो तसेच इलेक्ट्रिक काळी-पिवळी टॅक्सी बुक करता येणार आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांवर भर

या प्लॅटफॉर्मचा मुख्य भर इलेक्ट्रिक वाहनांवर आहे. जुन्या पेट्रोल आणि CNG वाहनांऐवजी चालकांनी ई-वाहनांकडे वळावे, यासाठी सरकारकडून प्रोत्साहन योजना (Incentive Scheme) प्रस्तावित करण्यात आली आहे.

मुंबईतील चालकांची संख्या वाढवण्यासाठी शहरातील प्रमुख ऑटो-टॅक्सी संघटनांसोबत भागीदारी करण्यात आली आहे. शशांक शरद राव यांच्या नेतृत्वाखालील संघटनेतील परवानाधारक चालक या प्लॅटफॉर्मवर जोडले जात आहेत.

ई-टॅक्सींसाठी आवश्यक चार्जिंग सुविधा

पियूष गोयल यांनी सांगितले की, मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये एक लाखांहून अधिक ऑटो रिक्षा आहेत. भविष्यात ई-ऑटो आणि ई-टॅक्सींसाठी आवश्यक चार्जिंग पायाभूत सुविधा (Charging Infrastructure) उभारण्यात स्थानिक लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची ठरेल.

ॲपमधील महत्त्वाची वैशिष्ट्ये

'भारत टॅक्सी' ॲपमध्ये प्रवासी सुरक्षेसाठी विविध सुविधा देण्यात आल्या आहेत:

  • आपत्कालीन परिस्थितीसाठी SOS बटण

  • स्थानिक पोलिस यंत्रणेशी समन्वय

  • चालकांची अनिवार्य पोलिस पडताळणी

  • रिअल-टाईम (Real-time) इमर्जन्सी प्रतिसाद प्रणाली

कमी कमिशन, जास्त उत्पन्न

या ॲपमध्ये कमी कमिशन मॉडेल ठेवण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी भाडे परवडणारे राहील आणि चालकांना अधिक उत्पन्न मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.

मीटरनुसार निश्चित भाडे प्रणाली लागू केली जाणार असून, त्यामुळे प्रवाशांचा विश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

चालकांसाठी 'मुद्रा' कर्ज सुविधा

चालकांना इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी सुमारे ९.५ टक्के व्याजदराने 'मुद्रा' कर्ज उपलब्ध होणार आहे. तसेच वाहन उत्पादक कंपन्यांसोबतच्या भागीदारीतून सवलतीच्या दरात वाहन खरेदीची संधीही उपलब्ध होणार आहे.

खासगी ॲप्सपेक्षा वेगळी रचना

'भारत टॅक्सी' सहकारी तत्त्वावर आधारित प्लॅटफॉर्म आहे. खासगी ॲप-आधारित कंपन्यांप्रमाणे जास्त कमिशन आकारले जाणार नसल्याने चालकांना अधिक आर्थिक फायदा होण्याची अपेक्षा आहे.

आधीच लाखो वापरकर्ते

दिल्ली NCR, गुजरात आणि लखनौमध्ये 'भारत टॅक्सी' सेवा आधीच सुरू आहे. आतापर्यंत ५.१७ लाखांहून अधिक चालक आणि सुमारे ५० लाख प्रवासी या प्लॅटफॉर्मशी जोडले गेले आहेत.

मुंबईत प्रवासी सेवा सुरू होण्यापूर्वीच सुमारे २५ हजार चालकांनी ॲप डाउनलोड केल्याची माहिती समोर आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in