

भाईंदर : मीरा-भाईंदर येथील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत टोमॅटोच्या कॅरेटवरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान भाजी विक्रेत्याच्या हत्येत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नवघर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
भाईंदर पूर्वेतील नवघर परिसरातील हनुमान मंदिराजवळील भाजी मार्केटमध्ये २९ मे रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास टोमॅटोच्या कॅरेटवरून दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी भाजी विक्रेते संतोष लल्लन सिंह (५३) यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.
आरोपी धीरज गुप्ता याने लोखंडी रॉडने संतोष सिंह यांच्या डोक्यावर प्रहार केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जैन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना मिरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर २ जून रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मृत संतोष सिंह यांचे भाऊ मनोज सिंह यांनी दिलेल्या तक्रारीनंतर नवघर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत बुधवारी चार आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये धीरज गुप्ता, रोशन गुप्ता, राजन गुप्ता आणि अजित गुप्ता यांचा समावेश आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) विविध कलमांन्वये नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे भाजी मार्केट परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.