BMC Election : २२७ जागांसाठी मुंबईत मतदान; महापालिका निवडणुकांची अधिसूचना जाहीर

बृहन्मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोमवारी (दि.१५) पत्रकार परिषदेत केली. ३.४८ कोटी मतदार, ३९ हजार मतदान केंद्रे असणारा महापालिका निवडणुकांचा आराखडा जाहीर करण्यात आला आहे.
BMC Election : २२७ जागांसाठी मुंबईत मतदान; महापालिका निवडणुकांची अधिसूचना जाहीर
BMC Election : २२७ जागांसाठी मुंबईत मतदान; महापालिका निवडणुकांची अधिसूचना जाहीर
Published on

मुंबई महापालिकेसह राज्यातील तब्बल २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर करण्यात आला आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान, तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोमवारी (दि.१५) पत्रकार परिषदेत केली. या निवडणुकांसाठी संबंधित महानगरपालिका क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाली आहे.

सह्याद्री अतिथिगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना वाघमारे म्हणाले की,"बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसह एकूण २,८६९ जागांसाठी या निवडणुका होणार आहेत. निवडणूक प्रक्रिया ही सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून राबवली जाणार आहे."

अधिसूचना व मतदानाची वेळ

राज्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, मुंबई महानगरपालिका निवडणुकीची अधिसूचना १६ डिसेंबर २०२५ आणि उर्वरित २८ महानगरपालिकांची अधिसूचना १८ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाईल.

सर्व महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. अधिसूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया संबंधित महानगरपालिका आयुक्त त्यांच्या स्तरावर पार पाडतील.

महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू

निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित महानगरपालिका क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात धोरणात्मक निर्णय घेण्यावर निर्बंध असणार आहेत. मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या घोषणा किंवा कृतीला मनाई करण्यात आली आहे. मात्र, नैसर्गिक आपत्ती व आपत्कालीन मदतीसाठी सूट असेल. आचारसंहितेचे पालन ४ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदेशांनुसार करणे बंधनकारक असेल.

मतदान पद्धतीत महत्त्वाचा फरक

• मुंबई महानगरपालिकेत - एक सदस्यीय प्रभाग पद्धत

- प्रत्येक मतदाराला एकच मत

• इतर २८ महानगरपालिकांमध्ये - बहुसदस्यीय प्रभाग पद्धत

- प्रत्येक प्रभागात ३ ते ५ जागा, त्यानुसार मतदारांना ३ ते ५ मते द्यावी लागणार आहेत.

नामनिर्देशनपत्रे ऑफलाईनच

महानगरपालिका निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे ऑफलाईन पद्धतीनेच स्वीकारली जाणार आहेत. संगणकीय प्रणाली उपलब्ध असली तरी राजकीय पक्षांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

जातवैधता प्रमाणपत्राबाबत अट

राखीव जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास अर्ज केल्याचा पुरावा द्यावा लागेल. तसेच, निकालानंतर ६ महिन्यांत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे.

मतदारसंख्या व ईव्हीएम व्यवस्था

  1. या निवडणुकांसाठी ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ मतदार आणि ३९,१४७ मतदान केंद्रे उपलब्ध करण्यात येणार आहेत.

  2. ईव्हीएम व्यवस्थेत ४३,९५८ कंट्रोल युनिट्स, ८७,९१६ बॅलेट युनिट्स असणार आहेत.

  3. तर मुंबईसाठी १०,१११ मतदान केंद्रे, ११,३४९ कंट्रोल युनिट्स आणि २२,६९८ बॅलेट युनिट्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना आता वेग येण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in