दादरमध्ये आयुक्तांची सरप्राइज व्हिजिट; बेकायदा फेरीवाल्यांची पळापळ

उच्च न्यायालयानेही कान टोचल्यानंतर पालिकेच्या रडारवर बेकायदा फेरीवाला आले आहेत. गेल्या पाच-सहा दिवसांपासून विविध रेल्वे स्टेशन परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.
दादरमध्ये आयुक्तांची सरप्राइज व्हिजिट; बेकायदा फेरीवाल्यांची पळापळ
Published on

मुंबई : उच्च न्यायालयानेही कान टोचल्यानंतर पालिकेच्या रडारवर बेकायदा फेरीवाला आले आहेत. गेल्या पाच-सहा दिवसांपासून विविध रेल्वे स्टेशन परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. तसेच अनधिकृत फेरीवाल्यांचे वीज कनेक्शन कट करा, रेल्वे स्टेशन परिसर चकाचक ठेवा, असे सक्त निर्देश पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी संबंधितांना दिले. दरम्यान, दादर स्टेशन परिसरात पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या माध्यमातून बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून सोमवारी दुपारी डॉ. भूषण गगराणी यांनी सरप्राइज व्हिजिट करत कारवाईचा आढावा घेतला.

पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले तसेच इतर अतिक्रमणे यामुळे पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. पालिकेच्या वतीने अनधिकृत फेरीवाले व पदपथांवरील अतिक्रमणे यावर केली जाणारी कारवाई अधिक तीव्र करण्याची सूचना उच्च न्यायालयाने केली आहे. त्यानुसार अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईला वेग द्यावा, आत्यंतिक वर्दळीच्या परिसरात अधिक नियोजनपूर्वक व मुंबई पोलिसांच्या सहकार्याने कारवाई करावी, रस्त्यांच्या कडेला बेवारस वाहने हटवावीत, जेणेकरून नागरिकांना व वाहतुकीला अडथळा होणार नाही, असे निर्देश भूषण गगराणी यांनी सर्व संबंधित विभागांना दिले होते.

दादर (पश्चिम) रेल्वे स्थानक परिसरातील सेनापती बापट मार्ग, केशवसूत उड्डाणपुलाखालून ये-जा करण्यासाठी असणारे प्रवाशी मार्ग, गाळे, तसेच संलग्न असणारे एम. सी. जावळे मार्ग, डॉ. डिसिल्वा मार्ग, रानडे मार्ग इत्यादी सर्व परिसरांमध्ये पायी फिरून पाहणी केली.

logo
marathi.freepressjournal.in