BMC चा डॉक्टरांवर बडगा; डीनच्या पाहणीत बायोमेट्रिक हजेरीत अनियमितता आढळली, ३५ डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस

जोगेश्वरी येथील एचबीटी ट्रॉमा केअर सेंटरमधील ३५ पदव्युत्तर डॉक्टरांना मुंबई महापालिकेने (बीएमसी) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सोमवारी रुग्णालयाच्या डीन यांनी केलेल्या पाहणीत डॉक्टरांच्या बायोमेट्रिक हजेरीत अनियमितता आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
BMC चा डॉक्टरांवर बडगा; डीनच्या पाहणीत बायोमेट्रिक हजेरीत अनियमितता आढळली, ३५ डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस
BMC चा डॉक्टरांवर बडगा; डीनच्या पाहणीत बायोमेट्रिक हजेरीत अनियमितता आढळली, ३५ डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस
Published on

अमित श्रीवास्तव/मुंबई :

जोगेश्वरी येथील एचबीटी ट्रॉमा केअर सेंटरमधील ३५ पदव्युत्तर डॉक्टरांना मुंबई महापालिकेने (बीएमसी) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सोमवारी रुग्णालयाच्या डीन यांनी केलेल्या पाहणीत डॉक्टरांच्या बायोमेट्रिक हजेरीत अनियमितता आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. काही डॉक्टर रुग्णालयात अवघा तासभर उपस्थित राहून पूर्ण वेतन घेत असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

डॉ. छाया शिंदे, डीन, डॉ. आर. एन. कूपर महापालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि एचबीटी ट्रॉमा केअर रुग्णालय यांनी या नोटिसा बजावण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. रुग्णालयाच्या पाहणीदरम्यान बायोमेट्रिक हजेरीच्या नोंदींमध्ये अनियमितता आढळल्यानंतर संबंधित डॉक्टरांना नोटिसा देण्यात आल्या असून, त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

नोटिसांनुसार, बायोमेट्रिक हजेरीच्या नोंदींमध्ये अपूर्ण किंवा अनियमित हजेरीची अनेक प्रकरणे आढळली आहेत. काही डॉक्टरांनी केवळ एकदाच पंच केला असून, त्यानंतर प्रवेश किंवा बाहेर पडण्याचा दुसरा पंच नोंदविलेला नसल्याचेही निदर्शनास आले आहे.

बीएमसीच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी नियमित आणि योग्य पद्धतीने बायोमेट्रिक हजेरी नोंदविणे बंधनकारक आहे. सरकारी सेवेत शिस्त, वेळेचे पालन आणि जबाबदारीच्या दृष्टीने हजेरी महत्त्वाची असल्याचे नोटिसांमध्ये नमूद करण्यात आले आहे. पूर्वपरवानगी किंवा समाधानकारक स्पष्टीकरणाशिवाय हजेरीची योग्य नोंद न केल्यास संबंधित कृती निष्काळजीपणा, कर्तव्यात कसूर किंवा गैरवर्तन ठरू शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

नोटीस मिळाल्यापासून ४८ तासांच्या आत लेखी खुलासा आणि आवश्यक असल्यास संबंधित कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश डॉक्टरांना देण्यात आले आहेत. योग्य कारण किंवा सक्षम अधिकाऱ्याची मंजुरी नसल्यास केवळ एक पंच असलेला दिवस पडताळणीनंतर आणि लागू नियमांनुसार ‘अनुपस्थित’ म्हणून ग्राह्य धरला जाऊ शकतो.

नोटीस बजावण्यात आलेल्या ३५ डॉक्टरांमध्ये व्याख्याते, विविध विशेष विभागांतील वैद्यकीय सल्लागार आणि बंधपत्रित डॉक्टरांचा समावेश आहे.

कारवाईची कारणे

  • ३५ पदव्युत्तर डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस

  • ४८ तासांत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश

  • काही डॉक्टरांनी केवळ एकच पंच केल्याचे निदर्शनास

  • योग्य स्पष्टीकरण नसल्यास संबंधित दिवस ‘अनुपस्थित’ धरला जाणार

  • नियमभंग झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा

  • डॉक्टरांनी दररोज ७ ते ८ तास सेवा बजावणे अपेक्षित

  • स्त्रीरोग, अस्थिरोग, भूलशास्त्र, बालरोग, रेडिओलॉजी, मानसोपचार आदी विभागांतील डॉक्टरांचा समावेश

  • गेल्या महिन्यातही बायोमेट्रिक हजेरीतील अनियमिततेप्रकरणी कंत्राटी व्याख्यात्याची सेवा समाप्त करण्यात आली होती.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in