मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीसाठी आज (दि. १५) सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. मात्र, मुंबईतील अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या तपशीलांमध्ये विसंगती आढळून आल्याने सुरुवातीच्या टप्प्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. विशेषतः बीएमसीच्या आर सेंट्रल आणि आर नॉर्थ वॉर्डअंतर्गत येणाऱ्या बोरीवली व दहिसर परिसरातील मतदान केंद्रांवर सकाळी मतदान सुरू होताच काही काळ संभ्रमाचे वातावरण होते.
वेगवेगळ्या बूथवर जावं लागलं...
मतदारांनी तक्रार केली की, "मतदान केंद्रांवर उपलब्ध असलेल्या मतदार यादीत आणि बीएमसीच्या ऑनलाइन डेटाबेसवर दाखवलेल्या मतदान केंद्र तपशीलांमध्ये मोठी विसंगती होती. त्यामुळे अनेकांना आपलं नाव शोधण्यासाठी दोन ते तीन वेगवेगळ्या बूथवर जावं लागलं." तथापि, मतदान अधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना कोणताही त्रास होऊ नये याची विशेष काळजी घेतली.
ठरलेल्या मतदान केंद्राच्या यादीत नाव नाहीच
दहिसर (पूर्व) येथील रहिवासी जितेंद्र जैन यांनी सांगितले, “माझं नाव माझ्या ठरलेल्या मतदान केंद्राच्या यादीत नव्हतंच. मी आणि माझा मुलगा चेतन, आम्हाला दोन वेगवेगळ्या केंद्रांवर जावं लागलं, तेव्हा कुठे नाव सापडलं.”
मतदान न करताच निघून गेले
सकाळी अनेक मतदान केंद्रांवर लांबलचक रांगा दिसल्या त्यात ऑफिसला जाणाऱ्या मतदारांची संख्या मोठी होती. मतदार केंद्रांवर स्वतःचं नाव शोधूनही मिळत नसल्याने अनेक मतदार मतदान न करता निघून गेले.
खारमध्ये नोकरी करणारे बोरीवलीतील रहिवासी मनिषभाई हे सकाळी मी ७.३० वाजता मतदान केंद्रावर पोहोचले होते. ते म्हणाले, "माझं नाव यादीत नव्हतं. अजून किती केंद्रांवर जावं लागेल, ते माहित नव्हतं, माझ्याकडे तेवढा वेळच नव्हता. म्हणून मी कामावर निघालो.”
भाजप नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क
उत्तर मुंबईचे माजी खासदार आणि भाजप नेते गोपाळ शेट्टी यांनी सकाळी वॉर्ड क्रमांक १७ मध्ये मतदान केले. त्यांच्यासोबत स्थानिक आमदार संजय उपाध्याय उपस्थित होते.
तरुणांचा उत्साह कायम
तथापि, मतदान यादीचा गोंधळ आणि लांबलचक रांगा असूनही पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुण मतदारांचा उत्साह मतदानावेळी दिसून आला.