फ्री प्रेस जर्नलच्या (FPJ) वतीने शनिवारी (दि.३) फ्री प्रेस हाऊसमध्ये आयोजित ‘FPJ डायलॉग’ या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी विविध विषयांवर भाष्य केले. "मराठी मतदार महायुतीच्या बाजूने निर्णायक कौल देतील," असा विश्वास निरुपम यांनी व्यक्त केला.
महायुती मुंबईच्या विकासावर लक्ष केंद्रित करत असताना ठाकरे बंधू मुंबई महापालिका निवडणूक भावनिक मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका निरुपम यांनी केली. "ठाकरे बंधूंनी कितीही प्रयत्न केले तरी मुंबईचा पुढील महापौर महायुतीचाच आणि तो मराठीच असेल," असा ठाम दावा त्यांनी केला.
ठाकरे गट विकासाच्या मुद्द्यावर मत मागू शकत नाही
“मुंबई महापालिका निवडणुकीत विकास हा मुख्य मुद्दा असायला हवा. मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गट विकासाच्या मुद्द्यावर मत मागू शकत नाही, कारण २५ वर्षांच्या सत्ताकाळात त्यांनी काहीही ठोस काम केलेले नाही,” असा आरोप निरुपम यांनी केला.
आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवू
एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या ३० महिन्यांच्या कार्यकाळात अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रो रेल्वे यांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर भर देण्यात आला, असे त्यांनी सांगितले. “आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवू, जे ठाकरे करू शकत नाहीत. अलीकडील सर्वेक्षणांतूनही त्यांचा पराभव निश्चित असल्याचे संकेत मिळाले आहेत,” असेही त्यांनी म्हटले.
मुस्लिम मतदार मनसेला मतदान करणार नाहीत
कॉँग्रेसने वेगळा मार्ग स्वीकारल्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेला मुस्लिम मते मिळणार नाहीत, असा दावा निरुपम यांनी केला. “राज ठाकरे यांनी भोंग्यांविरोधात आंदोलन केले होते, जे मुस्लिम समाजाला आवडले नाही. त्यामुळे मुस्लिम मतदार मनसेला मतदान करणार नाहीत. तसेच उत्तर भारतीय मतदारही ठाकरे बंधूंना पाठिंबा देणार नाहीत,” असे ते म्हणाले.
ठाकरेंना ४० ते ४५ जागांवरच पाठिंबा
निरुपम यांच्या मते, मुंबई महापालिकेच्या ११६ जागा आधीच ठाकरे बंधूंच्या हातून गेल्या आहेत. यामध्ये उत्तर भारतीय मतदारबहुल ७० जागा आणि मुस्लिम मतदारबहुल ४६ जागांचा समावेश आहे. “ठाकरे बंधूंना जास्तीत जास्त ४० ते ४५ जागांवरच पाठिंबा मिळू शकतो, जिथे कोअर मराठी मतदार आहेत,” असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व हळूहळू मराठी मतदार स्वीकारत असल्याचेही त्यांनी नमूद केले. मुंबईतील मतदार उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूतीच्या लाटेत वाहून जाणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदे कधीही कोणत्या समाजाविरोधात बोलत नाहीत
ठाकरे बंधूंच्या युतीनंतर झळकलेल्या ‘बटोगे तो पिटोगे’ आणि ‘बटोगे तो बार-बार पिटोगे’ अशा बॅनर्सवरही निरुपम यांनी टीका केली. हे घोषवाक्य उत्तर भारतीय मतदारांना खटकणारे असल्याचे त्यांनी सांगितले. “याउलट एकनाथ शिंदे कधीही कोणत्याही समाजाविरोधात बोलत नाहीत. त्यांनी कधी मुस्लिम किंवा उत्तर भारतीय समाजाला लक्ष्य केलेले नाही. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी विकास आणि प्रभावी प्रशासनावर सातत्याने भर दिला. त्यामुळेच अलीकडील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणात जनतेचा पाठिंबा मिळाला,” असे निरुपम म्हणाले.
एकनाथ शिंदे मराठी जनतेचा नेता
२००९ ते २०१४ या काळात मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले निरुपम म्हणाले की, “मराठी जनतेने बाळासाहेब ठाकरे यांना आपला नेता मानले आणि त्यांच्यासोबत ठामपणे उभी राहिली. आता त्यांनी एकनाथ शिंदे यांनाही आपला नेता मान्य केले आहे. २०२४ च्या लोकसभा, विधानसभा आणि अलीकडील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतून हे स्पष्ट झाले आहे.”