

मुंबई : कुप्रसिद्ध गुंड अरुण गवळी यांच्या दोन मुली गीता आणि योगिता गवळी यासह त्यांची भावजय वंदना गवळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत.
गीता गवळी या आधी दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या तर भावजय वंदना गवळी तीन वेळा विजयी झाल्या होत्या. योगिता गवळी या प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र, दोन्ही मुली आणि भावजयचा पराजय झाल्याने अरुण गवळी यांना मोठा धक्का बसला आहे. वंदना गवळी यांनी निवडणुकीच्या आधी काही दिवस आधी शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश करून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र, या तिघींनाही मतदारांनी नाकारले.
अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी या तीन वेळा निवडून आल्या होत्या. यावेळी त्या प्रभाग क्रमांक २१२ मधून निवडून आल्या होत्या. त्यांचा सपाच्या उमेदवार अब्राहिनी सैजाद यांनी पराभव केला. गीता गवळींनी भाजपला पाठिंबा दिला होता.
शिंदेसेनेतील प्रवेशानंतरही पराभव
अरुण गवळीच्या भावजय वंदना गवळी या निवडणुकीच्या काही दिवस आधी शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला होता. त्या प्रभाग क्रमांक १९८ मधून उभ्या होत्या. मात्र, त्यांचाही पराभव झाला. त्यांचा शिवसेना ठाकरे गटाच्या अबोली खाडे यांनी पराभव केला. त्यामुळे गवळीच्या दोन्ही मुली आणि भावजय यांचा पराभव झाल्याने अखिल भारतीय सेनेला मोठा धक्का मानला जात आहे.