मुंबई महानगरपालिकेला आज मिळणार नवे आयुक्त? राज्य सरकारने 'ही' तीन नावे पाठवली

निवडणूक आयोग बुधवारी दुपारपर्यंत या तीनपैकी एका नावावर शिक्कामोर्तब करू शकतो.
मुंबई महानगरपालिकेला आज मिळणार नवे आयुक्त? राज्य सरकारने 'ही' तीन नावे पाठवली
Published on

प्रतिनिधी/मुंबई

मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर आणि एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी या तीन जणांची नावे राज्य सरकारने मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविली आहेत. पदासाठी केवळ एकच नाव पाठविता येत नाही. निवड प्रक्रिया पारदर्शक असावी, यासाठी तीन जणांची नावे सुचवावी लागतात. निवडणूक आयोग बुधवारी यापैकी एक नाव अंतिम करू शकतो.

सध्याचे आयुक्त इक्बालसिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे व पी. वेलरासू यांची बदली करावी आणि त्यांच्या जागी नवीन नियुक्ती मंगळवारी सायंकाळपर्यंत करावी, असे आदेश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले होते. महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त ही पदे निवडणुकीशी संबंधित आहेत आणि या पदावर तीन वर्षे वा त्यापेक्षा अधिक कार्यकाळ झालेल्या अधिकाऱ्यांची बदली करावी, असे आयोगाने स्पष्ट केले होते. त्यानुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

मुंबई महानगरपालिकेचे नवे आयुक्त म्हणून भूषण गगराणी यांचे नाव प्रथम क्रमांकावर आहे. पण निवड प्रक्रिया करताना केवळ एकच नाव सुचविता येत नाही तर तीन नावांचे पॅनेल द्यावे लागते. त्यानुसार भूषण गगराणी, अनिल डिग्गीकर आणि डॉ. संजय मुखर्जी या तीन जणांची नावे सामान्य प्रशासन विभागाने सुचवली आहेत. निवडणूक आयोग बुधवारी दुपारपर्यंत या तीनपैकी एका नावावर शिक्कामोर्तब करू शकतो.

logo
marathi.freepressjournal.in