Mumbai : दादरमध्ये ‘मॉडेल पार्किंग’चा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण मुंबईत राबवणार; दिनांकानुसार लाल पांढरे पट्टे रेखाटले

मुंबईतील पार्किंगची समस्या दूर करणे आणि सार्वजनिक वाहनतळांचा वापर वाढावा यासाठी मुंबई महानगरपालिकेने दादर पश्चिम येथील जगन्‍नाथ सावंत मार्गावरील सार्वजनिक वाहनतळ ‘मॉडेल वाहनतळ’ म्हणून विकसित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
Mumbai : दादरमध्ये ‘मॉडेल पार्किंग’चा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण मुंबईत राबवणार; दिनांकानुसार लाल पांढरे पट्टे रेखाटले
Mumbai : दादरमध्ये ‘मॉडेल पार्किंग’चा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण मुंबईत राबवणार; दिनांकानुसार लाल पांढरे पट्टे रेखाटले
Published on

मुंबई : मुंबईतील पार्किंगची समस्या दूर करणे आणि सार्वजनिक वाहनतळांचा वापर वाढावा यासाठी मुंबई महानगरपालिकेने दादर पश्चिम येथील जगन्‍नाथ सावंत मार्गावरील सार्वजनिक वाहनतळ ‘मॉडेल वाहनतळ’ म्हणून विकसित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. स्थानिक नागरिकांसाठी मासिक पास शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात आली असून पहिल्‍या टप्‍प्‍यात ४०० सवलतीचे पास दिले जाणार आहेत. त्‍यानंतर मागणी आल्‍यानंतर स्‍वतंत्रपणे विचार करण्‍यात येईल.

या वाहनतळावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून, अतिरिक्त प्रकाशव्यवस्था व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. महिला वाहनचालकांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

‘नो पार्किंग’ क्षेत्र स्पष्टपणे दर्शविण्यासाठी रस्त्यांवर लाल-काळे पट्टे रंगविण्यात येत आहेत. तसेच सम-विषम दिनांकानुसार पार्किंग व्यवस्थेसाठी लाल व पांढरे पट्टे रेखाटले जात आहेत. वाहनतळाची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी दिशादर्शक फलकांची संख्याही वाढविण्यात आली आहे. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास, हा पथदर्शी प्रयोग संपूर्ण मुंबईतील वाहनतळांवरही राबविण्यात येणार आहेत.

मुंबईत वाढत्या वाहनसंख्येच्या पार्श्वभूमीवर वाहनतळ व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका विविध उपाययोजना राबवत आहे. नागरिकांना अधिकृत आणि सुरक्षित वाहनतळ सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महानगरपालिकेने संपूर्ण महानगरात वाहनतळांची सुविधा विकसित केली आहे. महानगरपालिकेकडे विविध ठिकाणी हस्तांतरित झालेल्या एकूण ३७ वाहनतळांमधून एकूण ३० हजार १३५ वाहनांच्या पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे.

पालिका आयुक्‍त अश्विनी भिडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली जगन्‍नाथ सावंत मार्गावरील वाहनतळात ‘मॉडेल पार्किंग’ उपक्रम राबविला जात आहे.

वाहनचालकांच्या सोयीसाठी जगन्‍नाथ सावंत मार्गावरील वाहनतळात १ हजार तीनचाकी व चारचाकी तसेच १२ दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था आहे. कोतवाल गार्डनसमोरील परिसर, कबुतरखाना, गणेश पेठ गल्‍ली तसेच टी. आर. सावंत मार्ग ते बाल गोविंददास मार्ग हा परिसर पूर्वीपासूनच ‘नो पार्किंग’ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या भागात सध्या २०० हून अधिक ‘नो पार्किंग’ फलक लावण्यात आले आहेत.

स्थानिकांना शुल्कात ५० टक्के सवलत

स्थानिक नागरिकांनी वाहनतळाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून मासिक पासवर ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात अशा सवलतीचे एकूण ४०० पास उपलब्ध आहेत. त्यानंतर मागणी आल्यानंतर स्वतंत्रपणे विचार करण्यात येणार आहे. व्हॅलेट पार्किंग सुविधेबाबत पालिका विचार करत आहे.

...तर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई

या सर्व उपाययोजनांचा भाग म्हणून जगन्‍नाथ सावंत मार्ग व परिसरातील ‘नो पार्किंग’ क्षेत्रात किंवा अन्य ठिकाणी वाहने उभी केल्याचे आढळल्यास १ जुलै २०२६ पासून वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक व दंडात्मक कारवाई करणार आहेत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा योग्‍य प्रतिसाद मिळाल्यास अशाच प्रकारच्या उपाययोजना मुंबई महानगरातील इतर भागांमध्ये राबविण्यास महापालिकेला बळ मिळेल. तसेच, वाहतूक कोंडीच्या समस्येत काही प्रमाणात दिलासा मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा बांगर यांनी व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in