

मुंबई : मानखुर्द, शिवाजीनगर, कुर्ला, चेंबूर यांसारख्या ठिकाणी जन्म दाखल्याच्या अर्जाचा तातडीने निपटारा करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची कुमक वापरावी. जन्म दाखल्याचे अर्ज स्वीकारण्यासाठी नागरी सुविधा केंद्राच्या वेळेत वाढ करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी दिले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम-पश्चिम कार्यालय चेंबूर येथे लवंगारे यांनी परिमंडळ ५ अंतर्गत प्रशासकीय विभागातील आरोग्य विभागाच्या कार्याचा शनिवारी आढावा घेतला. दरम्यान, जन्म दाखल्यासाठी लवकरच सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
मुंबई महापालिकेच्या एम-पूर्व, एम-पश्चिम व एल-विभागात जन्म दाखल्याशी संबंधित अर्ज प्रक्रिया करण्यासाठी अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. नागरिकांना दिलासा देण्यासाठी नागरी सुविधा केंद्रांवर सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात यावेत तसेच नागरिकांच्या सुविधेसाठी गरजेनुसार रविवारीही नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवावे, असे
निर्देश वर्मा-लवंगारे यांनी दिले. नागरी अर्ज हाताळणी करण्यासाठी प्रशासकीय विभाग पातळीवर सहाय्यक आयुक्तांनी अतिरिक्त मनुष्यबळ स्वीकारल्यानंतर किमान नेमावे. अर्ज
कालावधीत या अर्जाचा निपटारा करावा, अशा सूचना लवंगारे यांनी दिल्या. यावेळी उपायुक्त शरद उघडे, संध्या नांदेडकर, सहाय्यक आयुक्त उज्ज्वल इंगोले, शंकर भोसले आदी उपस्थित होते.
क्यूआर कोड आधारित जन्म दाखल्याचा निपटारा करा
शैक्षणिक बाबीशी संबंधित अर्जाचा निपटारा प्राधान्याने करण्यात यावा. परदेशी शिक्षण तसेच व्हिजा प्रक्रियेसाठी क्यूआर कोड आधारित जन्मदाखला मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होत आहेत. या अर्जाचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
विभागप्रमुखांनी नियमित आढावा घ्यावा
आरोग्य यंत्रणेचा कारभार अधिक पारदर्शक व्हावा तसेच नागरी समस्यांचे निराकरण जलदगतीने व्हावे, यासाठी विभागप्रमुखांनी नियमितपणे आढावा घ्यावा तसेच परिमंडळातील सहाय्यक आयुक्तांनी नियमितपणे स्थळभेटी द्याव्यात, असे निर्देश लवंगारे यांनी दिले.
अधिकाधिक पारदर्शकता आणा
जन्म दाखल्यात दुरुस्ती अर्ज, नवीन अर्ज यासाठी महापालिकेच्या माध्यमातून एक सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अर्जाशी संबंधित माहिती स्वीकारणे, संबंधित कागदपत्रे अपलोड करणे, डॅशबोर्ड तयार करण्यात येत आहे. सॉफ्टवेअर व डॅशबोर्डचा वापर जन्म दाखल्याशी संबंधित अर्जाच्या प्रक्रियेत अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासाठी करावा, अशाही सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान, यावेळी विविध प्रकल्पांचा आढावाही घेण्यात आला.