

देवश्री भुजबळ/मुंबई
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी शनिवारी कांजूरमार्ग डंपिंग ग्राऊंडची दोन तास आकस्मिक पाहणी केल्यानंतर तेथील भीषण दुर्गंधीची गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, डंपिंग ग्राऊंडमधील मिथेन वायूचे उत्सर्जन रोखण्यासाठी व रहिवाशांना दिलासा देण्यासाठी काय पावले उचलली, याची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र मुंबई पालिका सोमवारी न्यायालयात सादर करणार आहे.
न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने प्रशासनाच्या ‘कॅज्युअल’ दृष्टिकोनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. प्रदूषण आणि घातक उत्सर्जनावर तातडीने उपाययोजना न केल्यास कांजूरमार्ग डंपिंग ग्राऊंड बंद करण्याचे आदेश देऊ, असा इशारा न्यायालयाने सरकार व पालिकेला दिला आहे. दरम्यान, ‘यूसीएएलए’च्या अहवालानुसार, जगातील सर्वाधिक मिथेन उत्सर्जन करणाऱ्या २५ डंपिंग ग्राऊंडच्या यादीत कांजूरमार्ग १२ व्या क्रमांकावर आहे. डंपिंग ग्राऊंड रहिवासी क्षेत्रापासून किमान ५ किमी लांब असावे, या नियमाकडे दुर्लक्ष होत आहे, असे याचिकाकर्ते सतीश येवले यांनी सांगितले.