

मुंबई : प्रोबेशन कालावधी संपल्यानंतर कामगाराला कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी व्यवस्थापनाचे लेखी आदेश असणे अनिवार्य आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. केवळ प्रोबेशन काळ पूर्ण झाला म्हणून कोणताही कामगार आपोआप कायमस्वरूपी कर्मचारी होत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
नाशिक येथील 'किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेड'मधील चार कामगारांनी ही याचिका दाखल केली होती. या कामगारांना आधी प्रशिक्षणार्थी, त्यानंतर तात्पुरते कर्मचारी आणि शेवटी सहा महिन्यांच्या प्रोबेशनवर नियुक्त करण्यात आले होते.
प्रोबेशन कालावधी संपल्यानंतर कंपनीने त्यांच्या सेवा समाप्त केल्या होत्या. त्यावर याचिकेतून आक्षेप घेण्यात आला होता. याचिकेवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली.
मॉडेल स्टँडिंग ऑर्डर्सनुसार, प्रोबेशन पूर्ण झाल्यावर कामगाराला कायम करण्यासाठी व्यवस्थापकाने लेखी आदेश देणे आवश्यक आहे. जर कंपनी कामगाराच्या कामावर समाधानी नसेल, तर प्रोबेशन संपल्यानंतर त्याची सेवा समाप्त करण्याचा अधिकार कंपनीला आहे, असे न्यायालयाने म्हटले.