

मुंबई : पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि अडथळामुक्त पदपथ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुंबई पालिकेने हाती घेतलेल्या 'पादचारी प्रथम' अभियानांतर्गत भायखळा परिसरातील नागपाडा, मौलाना शौकत अली मार्गावरील फुटपाथवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. ई आणि सी विभागाच्या माध्यमातून फुटपाथवर उभारण्यात आलेली बेकायदा बांधकामे, स्टॉल तसेच अनधिकृत दुकाने हटविण्यात आली.
पदपथ हे पादचाऱ्यांना चालण्यासाठी असून सुरक्षित फुटपाथ पादचाऱ्यांना मिळावेत यासाठी मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांच्या आदेशानुसार पादचारी प्रथम मुंबई अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत महापालिकेच्या २६ विभागीय कार्यालय क्षेत्रात फुटपाथवरील अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. ई विभागाचे सहायक आयुक्त आनंदकंकाळ यांच्या नेतृत्वाखाली ई विभागात फुटपाथवरील अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवला जात आहे.
पादचाऱ्यांची गैरसोय टळणार
भायखळा परिसरातील नागपाडा, माझगाव डॉक, मुंबादेवी, मकदुम अली माहिम पूल, मौलाना शौकत अली मार्गावर फुटपाथवरच विविध प्रकारची दुकाने, स्टॉल आणि तात्पुरत्या स्वरूपातील बांधकामे उभारण्यात आल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालण्याची वेळ येत होती. त्यामुळे वाहतूककोंडीबरोबरच अपघाताचा धोकाही निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर, महापालिकेच्या संबंधित विभागाने अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई केली.
सातत्याने कारवाई सुरूच राहणार
'पादचारी प्रथम' या संकल्पनेनुसार शहरातील फुटपाथ हे प्रामुख्याने पादचाऱ्यांच्या वापरासाठी असणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक ठिकाणी फुटपाथवर अनधिकृत स्टॉल, दुकाने, शेड आणि इतर बांधकामांनी कब्जा केल्याने पादचाऱ्यांच्या हक्काचा मार्गच हिरावला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा अतिक्रमणांवर सातत्याने कारवाई सुरूच राहणार असल्याचे आनंद कंकाळ यांनी सांगितले.
अतिक्रमण होऊ नये म्हणून देखरेख
महापालिकेच्या कारवाईमुळे मौलाना शौकत अली मार्गावरील फुटपाथ पादचाऱ्यांसाठी खुले झाले आहे. मात्र, कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी संबंधित विभागाने नियमित देखरेख ठेवली जात आहे, असेही ते म्हणाले.