

मुंबई-बंगळुरू आणि मुंबई-नांदेड प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दोन नव्या मेल एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, बंगळुरू आणि मराठवाड्याकडे प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, एलटीटी-बंगळुरू मेल एक्स्प्रेस २३ मेपासून सुरू होणार आहे. ही ट्रेन आठवड्यातून दोन दिवस धावणार असून मुंबई, पुणे आणि बंगळुरूदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा अधिक सोयीस्कर पर्याय ठरणार आहे. या ट्रेनमध्ये एकूण १७ एलएचबी (LHB) डबे असतील. त्यामध्ये ६ स्लीपर कोच, १ सीटिंग-कम-लगेज (SLR) आणि १ पॉवरकारचा समावेश आहे.
ट्रेनचे वेळापत्रक
ट्रेन क्रमांक १६५५४ एलटीटी ते एसएमव्हीबी दरम्यान प्रत्येक रविवार आणि बुधवारी धावेल. ही ट्रेन रात्री ११.१५ वाजता एलटीटीहून सुटून दुसऱ्या दिवशी रात्री १०.३० वाजता बंगळुरूत पोहोचेल.
तर ट्रेन क्रमांक १६५५३ प्रत्येक शनिवार आणि मंगळवारी बंगळुरूहून रात्री ८.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ८.४० वाजता मुंबईत दाखल होईल.
'या' प्रमुख स्थानकांवर थांबा
ही ट्रेन बंगळुरू, दावणगेरे, हुबळी, बेळगाव, मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण, ठाणे आणि एलटीटी या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे.
मुंबई-नांदेडसाठीही नवी ट्रेन
याशिवाय, मध्य रेल्वेने मुंबई ते नांदेड दरम्यानही नवी नियमित द्विसाप्ताहिक ट्रेन सुरू केली आहे. ही सेवा २० मेपासून सुरू होणार आहे. नांदेड हे शीख धर्मियांचे महत्त्वाचे धार्मिक स्थळ असल्याने या मार्गावरील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
नांदेड-एलटीटी ट्रेनचे वेळापत्रक
नांदेड-एलटीटी आठवड्यातून दोन दिवस चालणारी ट्रेन प्रत्येक सोमवार आणि बुधवारी धावेल. सोमवारी सुटणारी ट्रेन रात्री ९.१५ वाजता नांदेडहून निघून दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता एलटीटीला पोहोचेल.
एलटीटी-नांदेड ट्रेन
एलटीटी-नांदेड ट्रेन प्रत्येक मंगळवार आणि गुरुवारी धावणार आहे. गुरुवारी सुटणारी ट्रेन सायंकाळी ४.५५ वाजता एलटीटीहून निघून दुसऱ्या दिवशी सकाळी ९.१० वाजता नांदेडला पोहोचेल.
कोणत्या स्थानकांवर थांबणार?
ही ट्रेन नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, भुसावळ, मनमाड, नाशिक, इगतपुरी, कल्याण आणि एलटीटी या स्थानकांवर थांबणार आहे.