Mumbai : फुकट्या प्रवाशांना मध्य रेल्वेचा दणका; मे महिन्यात २ लाख प्रवाशांकडून १३.९४ कोटी रुपयांचा दंड वसूल

मध्य रेल्वेने मे २०२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या सुमारे २ लाख प्रवाशांवर कारवाई करत १३ कोटी ९४ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. प्रथम श्रेणी डब्यांसह उपनगरीय रेल्वे सेवांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवून ही कारवाई करण्यात आली.
Mumbai : फुकट्या प्रवाशांना मध्य रेल्वेचा दणका; मे महिन्यात २ लाख प्रवाशांकडून १३.९४ कोटी रुपयांचा दंड वसूल
Published on

मुंबई उपनगरीय रेल्वेतील विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी मध्य रेल्वेने राबवलेल्या विशेष तपासणी मोहिमेत मे महिन्यात तब्बल २ लाख प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत १३ कोटी ९४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, ही रक्कम मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल १४० टक्क्यांनी अधिक आहे.

मध्य रेल्वेने आपल्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) खात्यावर ही माहिती जाहीर केली. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, मे २०२५ मध्ये १.२७ लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली होती आणि त्यांच्याकडून ५ कोटी ८१ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता.

प्रथम श्रेणी डब्यांमध्येही विशेष तपासणी

अलीकडेच राबवण्यात आलेल्या तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान मुंबई लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये विनावैध तिकीट प्रवास करणारे १५९ प्रवासी आढळून आले. या प्रवाशांवर एकूण ५० हजार ५७५ रुपयांचा दंड आकारण्यात आला.

मध्य रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार, विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली होती.

एप्रिलमध्येही मोठ्या प्रमाणात कारवाई

एप्रिल २०२६ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, मुंबई विभागात विनातिकीट प्रवासाची १.३४ लाख प्रकरणे नोंदवली गेली होती. यानंतर मध्य रेल्वेने तपासणी मोहीम आणखी तीव्र केली आहे.

सतत सुरू असतात तपासणी मोहिमा

प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि त्रासमुक्त प्रवासाचा अनुभव मिळावा तसेच विनातिकीट आणि अनियमित प्रवास रोखता यावा यासाठी मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गांवर नियमितपणे तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते. यामध्ये लोकल रेल्वे, मेल-एक्स्प्रेस गाड्या, प्रवासी गाड्या तसेच विशेष सुट्टीकालीन गाड्यांचाही समावेश असतो.

मध्य रेल्वेने प्रवाशांना वैध तिकीट किंवा पाससह प्रवास करण्याचे आवाहन केले असून, दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. “वैध तिकिटासह सन्मानाने प्रवास करा,” असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

पश्चिम रेल्वेचाही विक्रम

दरम्यान, पश्चिम रेल्वेने एप्रिल २०२६ मध्ये तिकीट तपासणी महसुलाचा नवा विक्रम नोंदवला. या महिन्यात पश्चिम रेल्वेला २७ कोटी ३७ लाख रुपयांचा महसूल मिळाला. यापूर्वी मे २०२२ मध्ये २५ कोटी ९८ लाख रुपयांचा सर्वोच्च महसूल नोंदवला गेला होता. नव्या आकडेवारीनुसार महसुलात ५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in