

रेल्वेने दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा देत मध्य रेल्वेने स्टेशनवरील खाद्यपदार्थांच्या दरवाढीचा प्रस्ताव मागे घेतला आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर या निर्णयावर टीका होत असतानाच रेल्वे प्रशासनाने हा प्रस्ताव स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आदेश येईपर्यंत जुन्याच दराने खाद्यपदार्थांची विक्री सुरू राहणार आहे. त्यामुळे वडा पाव आणि समोसा या लोकप्रिय पदार्थांच्या प्रस्तावित दरवाढीला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे. ही दरवाढ १ जूनपासून लागू होणार होती.
प्रस्तावानुसार वडा पावची किंमत १३ रुपयांवरून थेट २० रुपये करण्यात येणार होती, तर समोसा १२ रुपयांवरून २० रुपये करण्याचा प्रस्ताव होता. याशिवाय रगडा पाव, भेळ आणि पावावर आधारित इतर पदार्थांच्याही किंमती वाढवण्याचा प्रस्ताव होता.
प्रस्तावात पुढीलप्रमाणे दर ठेवण्यात आले होते-
वडापाव : १३ रुपये ते २० रुपये
सामोसा : १२ रुपये ते २० रुपये
रगडा पाव : २० रुपये ते २५ रुपये
पाव : ३ रुपये ते ५ रुपये
एक पावसह रगडा/उसळ : २० रुपये ते २५ रुपये
सुकी भेळ : २० रुपये ते २५ रुपये
चटणी भेळ : २५ रुपये ते ३० रुपये
ज्यूस आणि सोडा उत्पादनांचे दर
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, ज्यूस किंवा सोडा-आधारित उत्पादनांच्या दरात कोणतीही वाढ प्रस्तावित करण्यात आली नव्हती.
मुंबई आणि परिसरातील प्रवाशांवर वाढत्या महागाईचा परिणाम होत असताना प्रवासाशी संबंधित खर्च वाढण्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेच्या धर्तीवर दरवाढीची तयारी
रेल्वे अधिकाऱ्यांनी यापूर्वी सांगितले होते की, पश्चिम रेल्वेच्या धर्तीवर ही दरवाढ लागू करण्यात येत होती. पश्चिम रेल्वेने २०२१ नंतर २०२५ मध्ये खाद्यपदार्थांच्या दरांमध्ये बदल केला होता.
सुधारित मेनूमध्ये डोसा, नूडल्स, सूप, स्लश ड्रिंक्स आणि क्रीम भरलेले डोनट्स यांसारखे नवीन पदार्थही स्टेशनवरील स्टॉलवर उपलब्ध करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, या निर्णयावर केटरिंग संघटना आणि प्रवासी संघटनांकडून तीव्र आक्षेप घेण्यात आले.
केटरिंग संघटना आणि प्रवासी संघटनांकडून विरोध
केटरिंग संघटनेच्या एका प्रतिनिधीने आरोप केला की, रेल्वे प्रशासन स्वस्त दरातील स्थानिक सुटे खाद्यपदार्थ जसे की चणे, शेंगदाणे, चिक्की आणि मिल्कशेक यांच्या विक्रीला मर्यादा आणत असून त्याऐवजी ब्रँडेड पॅकेज्ड पदार्थांना प्राधान्य दिलं जात आहे.
त्यांच्या मते, ब्रँडेड पदार्थ अनेकदा महाग असतात आणि स्थानिक पदार्थांच्या तुलनेत नेहमीच अधिक दर्जेदार किंवा अधिक प्रमाणात असतीलच असं नाही.
प्रवासी संघटनांनीही इशारा दिला होता की, स्टेशनवरील खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्यास त्याचा सर्वाधिक फटका कमी उत्पन्न गटातील प्रवाशांना बसू शकतो. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेत अशा प्रवाशांची संख्या मोठी आहे.
सध्या जुन्याच दरात खाद्यपदार्थ उपलब्ध
सध्या तरी मध्य रेल्वेच्या स्टेशनवर प्रवाशांना जुन्याच दरात खाद्यपदार्थ खरेदी करता येणार आहेत. पुढील अधिकृत घोषणा होईपर्यंत हेच दर लागू राहणार असल्याचं रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.