मुंबईत गुरुवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाने शुक्रवारी काहीशी विश्रांती घेत शनिवारी अधूनमधून सरीने बरसला. येत्या २४ तासांत मुंबई शहर व उपनगरांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, पहाटे काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मुंबई आणि परिसरात समाधानकारक पाऊस पडतो आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातही दमदार पाऊस कोसळत असल्याने तलावांतील पाणीसाठा वाढतो आहे. त्यामुळे मुंबईत लागू असलेली पाणीकपातही येत्या सोमवारपासून रद्द करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. शुक्रवारी पावसाने काहीशी उसंत घेतल्यानंतर शनिवारी अधूनमधून सरीने कोसळला. सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरात ८.४१ मिमी, पूर्व उपनगरांत ५.९६ मिमी तर पश्चिम उपनगरांत ३.८८ मिमी पावसाची नोंद झाली.
समुद्राला सायंकाळी ४.१३ वाजताच्या दरम्यान भरती होती. यावेळी ४.१९ मीटर उंचीच्या लाटा उसळल्या. दरम्यान, येत्या २४ तासांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
शहरात २, पूर्व उपनगरांत ४ अशा एकूण सहा ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या कोसळल्या. या घटनेत कोणालाही मार लागलेला नाही.