'ही स्टंटबाजी आहे की...'; मुलावर झालेल्या आरोपांनंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदेंनी मला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा केला होता गंभीर आरोप
'ही स्टंटबाजी आहे की...'; मुलावर झालेल्या आरोपांनंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

काल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत, "खासदार श्रीकांत शिंदे यांनी मला जीवे मारण्यासाठी सुपारी दिली आहे," असा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मुलगा खासदार श्रीकांत शिंदेंवर झालेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांनी केलेल्या आरोपाची चौकशी होईल, असे आश्वासन दिले आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "संजय राऊतांनी केलेल्या आरोपाची चौकशी होईल. त्यांच्या सुरक्षेबाबत पोलीस निर्णय घेतील. त्यांनी जे आरोप केले आहेत, त्याचीही चौकशी होणार आहे. ही स्टंट बाजी आहे का? हेही तपासले जाणार आहे. कोण विरोधीपक्षात आहे, याचा विचार न करता गरज असल्यास अधिक सुरक्षादेखील पुरवण्यात येईल." असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ; लिहिले उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

दरम्यान, संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला मारण्यासाठी ठाण्यातल्या कुख्यात गुंडाला सुपारी दिली आहे, असा आरोप केला. याबद्दल त्यांनी ठाणे पोलीस आयुक्त, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिले. या प्रकारानंतर संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in