मविआत फुट? काँग्रेस BMC निवडणूक स्वबळावर लढणार; विजय वडेट्टीवार म्हणाले, "मनसेसोबत...

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम आता सुरू झाली आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सर्व पक्षांमध्ये राजकीय समीकरणांची चुरस वाढलेली दिसत आहे. यातच महाविकास आघाडी संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.
मविआत फुट? काँग्रेस BMC निवडणूक स्वबळावर लढणार; विजय वडेट्टीवार म्हणाले, "मनसेसोबत...
Published on

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम आता सुरू झाली आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सर्व पक्षांमध्ये राजकीय समीकरणांची चुरस वाढलेली दिसत आहे. यातच महाविकास आघाडी संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. आगामी BMC निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. यामुळे आता महाविकास आघाडीत फुट पडणार का? यावर चर्चा सुरू झाल्या आहेत.

स्वतंत्र लढणार - काँग्रेस

विजय वडेट्टीवार म्हणाले, "आमच्या मुंबई महापालिकेच्या नेत्यांनी ठरवलं आहे. आम्ही स्वतंत्र लढणार. त्यामुळे कोणाला किती जागा हा प्रश्न निर्माण होत नाही. आपण ज्यावेळी आघाडीचा धर्म पाळतो त्यावेळेस कोणी कोणाला कमकुवत करण्यापेक्षा आपण कसे मजबूत होऊ? याचा विचार अधिक प्रकर्षाने करण्याची गरज आहे."

मुंबईतील प्रश्नांसोबत लढणार

त्यांनी पुढे म्हटलं, "हायकमांड सोबत चर्चा केल्यावरच आम्ही स्थानिक पातळीवर चर्चा करण्याचा निर्णय दिलेला आहे. मुद्दे खूप आहेत. मुंबईची तिजोरी खाली झालेली आहे. मुंबईमध्ये भ्रष्टाचार प्रचंड होत आहेत. खिरापत वाटली जात आहे. आता एक विषय नाहीये. मुंबईच्या एकूण विकासाला, आर्थिक सुबत्तेला छेद देणारी घटना, सगळे प्रकार मागच्या सरकारच्या काळात झाले आहेत. आताच्या सरकारमध्येही होत आहेत. त्यामुळे डीपॉझिट खाली करून घेतलेत. मुंबईमध्ये पाणी अजूनही तुंबत आहे. नद्या, नाले स्वच्छ झालेले नाहीत. अनेक प्रश्न आहेत. भारतातील नव्हे तर जगातील सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे. या महानगर पालिकेतील प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना सोबत घेऊन आम्ही लढू."

कार्यकर्त्यांना प्राधान्य

वडेट्टीवार यांनी या निवडणुकीत प्राधान्यक्रम कार्यकर्त्यांना दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, "ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यांना लढण्याची संधी मिळायला हवी. जिंकणं हा प्राथमिक उद्देश नसला तरी कार्यकर्त्यांना न्याय देणे आमच्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे."

मनसे सोबत जाणार का?

उद्धव ठाकरे-मनसे संभाव्य युतीवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, "मित्रपक्षाचा प्रस्ताव आला तर त्यावर चर्चा नक्की होईल, शरद पवार पक्षाकडून जर प्रस्ताव आला तर त्यावर आम्ही चर्चा करू. ते मनसे सोबत युती करत असतील आणि त्यांचा प्रस्ताव आला तर आम्ही स्थानिक नेत्यांकडे हा प्रस्ताव पाठवू आणि ते जे निर्णय घेतील त्यावर आम्ही पुढे जाऊ." त्यामुळे आता मनसेसोबत जाण्याचा कोणताही विचार नसल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in