दूषित पाणीप्रकरणी विक्रोळी कन्नमवार येथे ५०० घरांचे सर्वेक्षण

कन्नमवार नगर येथील इमारत क्रमांक १४ व आजूबाजूचा परिसर हा ‘म्हाडा’अंतर्गत येतो. त्या ठिकाणी अस्तित्वात असलेले जलवाहिनीचे जाळे हे ‘म्हाडा’ प्राधिकरणाच्या मालकीचे आहे. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य जलवाहिनीमधून म्हाडा प्राधिकरणाच्या अंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी असलेल्या भूमिगत टाक्यांमध्ये पाणीपुरवठा केला जातो.
दूषित पाणीप्रकरणी विक्रोळी कन्नमवार येथे ५०० घरांचे सर्वेक्षण

मुंबई : विक्रोळी कन्नमवार येथील दूषित पाण्याची समस्या दूर करण्यासाठी या ठिकाणच्या ५०० घरांतील २,६५८ लोकांचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले आहे. या ठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, २ ते ३ नागरिक वगळता अन्‍य कोणालाही दूषित पाण्यामुळे आरोग्‍य समस्‍या आढळलेल्‍या नाहीत. दरम्यान, याठिकाणी असलेल्या जलवाहिनी जाळ्याच्या देखभालीची सूचना म्हाडाला करण्यात आली आहे.

कन्नमवार नगर येथील इमारत क्रमांक १४ व आजूबाजूचा परिसर हा ‘म्हाडा’अंतर्गत येतो. त्या ठिकाणी अस्तित्वात असलेले जलवाहिनीचे जाळे हे ‘म्हाडा’ प्राधिकरणाच्या मालकीचे आहे. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य जलवाहिनीमधून म्हाडा प्राधिकरणाच्या अंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी असलेल्या भूमिगत टाक्यांमध्ये पाणीपुरवठा केला जातो. त्यानंतर परिसरात म्हाडा क्षेत्रात असलेल्या स्वतंत्र इमारतींना ‘म्हाडा’ प्राधिकरणाद्वारे त्यांच्या पाणीवितरण व्यवस्थेद्वारे पुरवठा केला जातो. म्हाडा न्यासाच्या अंतर्गत जलवाहिनीचे जाळे हे ‘म्‍हाडा’च्या मालकीचे असल्‍याने त्याचे प्रचलन व परिरक्षण देखील त्यांच्याद्वारे केले जाते.

महानगरपालिका प्रशासनाने दूषित पाणी गळतीच्या नेमक्या ठिकाणाचा शोध घेण्याचे काम हाती घेतले आहे. जलवाहिनीतील गळती, दूषित स्रोत शोधण्यासाठी अत्याधुनिक क्राऊलर कॅमेऱ्याचा वापर केला आहे. त्यामुळे ही कामेदेखील हाती घेण्यात आली आहेत.

सार्वजनिक आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने खबरदारीचा उपाय म्‍हणून बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या कन्नमवार नगर आरोग्य केंद्रातील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांमार्फत इमारत क्रमांक ६, ७, ८, १२, १८ मध्ये एकूण ५०० घरे आणि २ हजार ६५८ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी ३ नागरिकांना मळमळ आणि उलट्या यांसारख्या समस्‍या आढळल्या. त्यांना योग्य वैद्यकीय उपचार पुरवले आहेत. क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले रुग्णालय आणि ७ खासगी दवाखान्यात आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी भेट दिली. महानगरपालिकेचे रुग्णालय किंवा खासगी दवाखान्यामध्‍ये जलजन्य संसर्ग रुग्णांची वाढ आढळून आलेली नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

इमारतींमध्ये घेतले पाण्याचे नमुने

दूषित पाणीपुरवठा होत असलेल्‍या इमारतीतील पाण्याचे नमुने घेण्‍यात आले असून महानगरपालिकेच्‍या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्‍यात आले आहेत. त्यावर प्राप्त होणाऱ्या अहवालानुसार पुढील योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच कन्नमवार नगर येथील स्थानिक नागरिकांच्या आरोग्याकडे सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे, असे बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे स्‍पष्‍ट करण्‍यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in