

वसई : ‘समृद्धी महामार्ग’ आता काही आरटीओ अधिकाऱ्यांच्या कथित वसुलीमुळे चर्चेत आला आहे. सिन्नर टोलनाका, एसएमबीटी हॉस्पिटलजवळील टोलनाका तसेच इगतपुरी टोलनाका येथे दररोज आरटीओ अधिकारी वाहनांची तपासणीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात प्रवाशांना अडवून त्रास देत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते एलायस जोसेफ डिसिल्व्हा यांनी केला आहे.
समृद्धी महामार्गावर वाहन फास्टॅग, सीसीटीव्ही कॅमेरे, डिजिटल मॉनिटरिंगद्वारे तपासले जाते. तरीही टोलनाक्यांच्या बाहेर खासगी कार, टेम्पो आणि ट्रक थांबवून “लायसन्स, पीयूसी, इन्शुरन्स, आरसी” तपासणीच्या नावाखाली रक्कम उकळली. यामुळे बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या पर्यटक आणि व्यावसायिकांमध्ये महाराष्ट्राची नकारात्मक प्रतिमा तयार होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
दोन हजारांत तोडपाणी
कागदपत्रे पूर्ण असूनही वाहनधारकांना ‘केस करतो’, ‘गाडी जप्त करतो’ अशा धमक्या दिल्या जातात. त्यानंतर ५०० ते २ हजार रुपयांपर्यंत रोख व्यवहार करून वाहन सोडले जाते. अनेक वेळा अधिकृत पावतीदेखील दिली जात नाही, असा दावा डिसिल्व्हा यांनी केला आहे.