कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! महाशिवरात्रीनिमित्त CSMT-सावंतवाडी रोड विशेष ट्रेन; वाचा वेळापत्रक
महाशिवरात्रीनिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविक आणि प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोकण मार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने (Central Railway) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या विशेष गाड्या १४, १९ आणि २१ फेब्रुवारी २०२६ रोजी धावणार आहेत.
१४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे, १५ फेब्रुवारीला महाशिवरात्री आणि १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्याने या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे सणासुदीच्या काळात कोकणात प्रवास करणाऱ्यांसाठी ही विशेष रेल्वे सेवा दिलासादायक ठरणार आहे.
प्रतीक्षा यादी वाढली; विशेष गाडीमुळे दिलासा
महाशिवरात्रीच्या निमित्ताने कोकणातील अनेक प्राचीन शिव मंदिरांत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. श्रीवर्धन, महाड, खेड, गुहागर, संगमेश्वर, देवगड कोकणातील या ठिकाणी अनेक भाविक जात असतात. या काळात नियमित रेल्वेगाड्यांच्या प्रतीक्षा याद्या प्रचंड वाढतात. त्यामुळे प्रवाशांना वेळेवर तिकीट मिळणे कठीण होते आणि अनेक भाविकांना कोकणातील धार्मिक तसेच पर्यटन स्थळांना भेट देणे अवघड जाते. अशा परिस्थितीत सीएसएमटी-सावंतवाडी रोड ही विशेष रेल्वेगाडी भाविक आणि प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
गाडीचे वेळापत्रक
माहितीनुसार, विशेष गाडी क्रमांक ०११२९ ही सीएसएमटीवरून रात्री १२.२० वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी १२.३० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.
परतीच्या प्रवासात विशेष गाडी क्रमांक ०११३० ही सावंतवाडी रोडवरून सायंकाळी ५.२० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता सीएसएमटी येथे दाखल होईल.
विशेष रेल्वेची संरचना
या विशेष रेल्वेगाडीत एकूण २२ कोच असतील.
टू टियर एसी (2A) - ०१ कोच
थ्री टियर एसी (3A) - ०५ कोच
स्लीपर (SL) - १० कोच
जनरल (GS) - ०४ कोच
एसएलआर (SLR) - ०२ कोच
वरील विशेष रेल्वेगाड्यांच्या थांब्यांबाबत व वेळापत्रकाबाबत सविस्तर माहितीसाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
कोकण मार्गावरील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे
रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ही विशेष रेल्वे दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबणार आहे.
तिकीट बुकिंगची माहिती
या विशेष गाड्यांसाठी तिकीट बुकिंग १० फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, प्रवाशांना सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) काऊंटर तसेच IRCTC च्या संकेतस्थळावर आणि मोबाईल अॅपवर तिकिटे उपलब्ध असतील.
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले की, फेब्रुवारी महिन्यात कोकण मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढत असल्याने ती कमी करण्यासाठी आणि भाविकांचा प्रवास सुलभ करण्याच्या उद्देशाने या विशेष गाड्या चालवण्यात येत आहेत.
होळीसाठी पश्चिम रेल्वेची मोठी घोषणा
दरम्यान, पश्चिम रेल्वेने (Western Railway) होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी २३१ विशेष रेल्वे गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या गाड्या १ मार्च ते २२ मार्च २०२६ या कालावधीत देशातील विविध भागांसाठी धावणार आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानसह उत्तर व पूर्व भारतातील राज्यांवर या सेवांचा विशेष भर असणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

