मुंबईतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि.९) विधानसभेत यासंदर्भात माहिती दिली. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मुद्दा उपस्थित करताच, "ही प्रतिमा सीएसएमटीच्या पुनर्विकासाच्या मास्टर प्लॅनमध्ये आधीच समाविष्ट आहे," असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
ऐतिहासिक वास्तूचा गौरव अपूर्ण - भास्कर जाधव
आमदार भास्कर जाधव यांनी प्रश्नोत्तरात मुद्दा उपस्थित केला की, "टर्मिनसला शिवाजी महाराजांचे नाव असले तरी प्रत्यक्षात परिसरात त्यांची प्रतिमा नाही. ज्यामुळे या ऐतिहासिक वास्तूचा गौरव अपूर्ण वाटतो." त्यांनी सांगितले की, "हा परिसर सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे शिवरायांची भव्य प्रतिमा आवश्यक आहे."
CSMT आपल्या अभिमानाचे स्थान
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक हे आपल्या अभिमानाचे स्थान आहे. याठिकाणी पुतळा उभारण्याची मागणी पूर्वीही करण्यात आली होती. त्यावेळी या संदर्भातील आराखडा तयार असल्याचे सांगण्यात आले होते. “केंद्र सरकारने आधीच निर्णय घेतला आहे. राज्याकडून नवीन प्रस्ताव पाठवण्याची आवश्यकता नव्हती.” असे मुख्यमंत्री फडणवीस भास्कर जाधव यांच्या मुद्द्यावर म्हणाले.
नव्या पुनर्विकास योजनेत शिवरायांच्या प्रतिमेचा समावेश
ते पुढे म्हणाले की, "रेल्वे राज्यमंत्री यांनी अलीकडे दिलेले उत्तर हे जुन्या लेआउट प्लॅनसंदर्भात होते. नव्या पुनर्विकास योजनेत शिवरायांची प्रतिमा समाविष्ट करण्यात आली आहे. मात्र अलीकडे लोकसभेत आलेले उत्तर हे जुन्या आराखड्याशी संबंधित असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी स्वतः स्पष्ट केले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले."
"नवीन आराखड्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्याचा प्रस्ताव असून त्याच्या अंतिम मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. नवीन आराखडा मंजूर झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर अत्यंत भव्य असा पुतळा उभारला जाणार आहे. लोकसभेत आलेले उत्तर हे केवळ जुन्या आराखड्यावर आधारित असल्याने गैरसमज निर्माण झाला." असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
सीएसएमटी पुनर्विकास आणि शिवरायांच्या प्रतिमेचा मुद्दा आगामी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकांमध्ये राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे.