Dadar BEST Bus Accident : घरात लग्नाची तयारी, बहिणीच्या संसाराचीही स्वप्नं; पण क्षणात सर्व संपलं, २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

दादरमधील भीषण बेस्ट बस अपघातात २८ वर्षीय नियाझ अहमद याचा मृत्यू झाला. कुटुंबाचा एकमेव आधार असलेला नियाझ काही दिवसांत लग्नाच्या बोलणीसाठी गावी जाणार होता.
दादरमधील भीषण बेस्ट बस अपघातात २८ वर्षीय नियाझ अहमद याचा मृत्यू झाला.
दादरमधील भीषण बेस्ट बस अपघातात २८ वर्षीय नियाझ अहमद याचा मृत्यू झाला.
Published on

दादरमधील भीषण बेस्ट बस अपघातात मृत्यू झालेला २८ वर्षीय नियाझ अहमद हा केवळ स्वतःच्या नव्हे तर संपूर्ण कुटुंबाच्या स्वप्नांसाठी झटत होता. बहिणीच्या लग्नासाठी पैसे साठवणे, स्वतःचे लग्न ठरवणे आणि कुटुंबाला आर्थिक आधार देणे अशी अनेक स्वप्ने त्याने उराशी बाळगली होती. मात्र दादरमधील अपघाताने त्याचा जीवनप्रवास अचानक संपला.

'इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, नियाझ अहमद हा स्विगीमध्ये डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता. सोमवारी (दि. ८) सकाळी दादर पश्चिम येथील प्लाझा सिनेमाजवळ बेस्टची इलेक्ट्रिक बस नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला.

कुटुंबासाठी मुंबईत आला

उत्तर प्रदेशमधील रहिवासी असलेला नियाझ सुमारे पाच वर्षांपूर्वी रोजगाराच्या शोधात मुंबईत आला होता. सुरुवातीला तो हातगाडीवर कांदा-बटाटा विकण्याचे काम करत होता. नंतर अधिक उत्पन्न मिळावे म्हणून त्याने स्विगीमध्ये काम सुरू केले. मुंबईत तो चुलत भावासोबत राहत होता. त्याचे आई-वडील आणि धाकटी बहीण उत्तर प्रदेशमध्ये राहतात. वडिलांना दृष्टीदोष असल्याने घराची बहुतांश जबाबदारी नियाझवरच होती.

लग्नाची बोलणी सुरू होती

कुटुंबीयांच्या माहितीनुसार, नियाझच्या लग्नाबाबत चर्चा सुरू होती. त्यासाठी तो १७ जून रोजी गावी जाणार होता. त्याचबरोबर धाकट्या बहिणीच्या लग्नासाठीही तो पैसे साठवत होता. त्याचे काका रोज अली यांनी सांगितले की, "नियाझला आता आर्थिकदृष्ट्या स्थिर वाटू लागले होते. स्वतःचे आणि बहिणीचे लग्न करण्यासाठी तो नियोजन करत होता. भविष्यासाठी त्याने अनेक स्वप्ने पाहिली होती."

एका क्षणात सर्व काही बदलले...

सोमवारी सकाळी प्लाझा सिनेमाजवळ बेस्ट बसचे नियंत्रण सुटले आणि बसने एकामागोमाग पाच वाहनांना धडक दिली. यावेळी इलेक्ट्रिक स्कूटरवर असलेला नियाझ अहमदही बसच्या धडकेत गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने सायन रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

"मी कामावर असताना अपघाताची माहिती मिळाली. रुग्णालयात पोहोचेपर्यंत नियाझ आपल्यात नसल्याचे समजले," असे त्याचे काका म्हणाले.

मदतीची मागणी

नियाझच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी सरकार आणि स्विगीकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. "नियाझ हा घरातील एकमेव कमावता सदस्य होता. त्याच्या जाण्याने कुटुंबाचा आधार हिरावला आहे," असे कुटुंबीयांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in