मानखुर्दमध्ये दहीहंडी उत्सवात दुर्दैवी घटना; एका गोविंदाचा मृत्यू, मुंबई-ठाण्यात अनेक जखमी

राज्यभरात आज दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. मुंबई आणि ठाण्यात शेकडो ठिकाणी मोठमोठ्या दहीहंडी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अनेक गोविंदा पथके सहभागी झाली आहेत.
प्रातिनिधिक फोटो | सलमान अन्सारी (FPJ)
प्रातिनिधिक फोटो | सलमान अन्सारी (FPJ)
Published on

राज्यभरात आज दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. मुंबई आणि ठाण्यात शेकडो ठिकाणी मोठमोठ्या दहीहंडी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अनेक गोविंदा पथके सहभागी झाली आहेत. सकाळपासूनच मुंबईत उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, या उत्साहात मानखुर्द येथे दुर्दैवी घटना घडली असून एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे.

मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरमध्ये बाल गोविंदा पथक पोहोचले असताना ३२ वर्षीय जगमोहन चौधरी हा दोर बांधत असताना अचानक खाली पडला. यात गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मुंबईतील विविध ठिकाणी दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण ३० गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी १५ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून उर्वरित १५ गोविंदांवर अजूनही उपचार सुरू आहेत.

ठाण्यातही अशाच प्रकारची दुर्घटना घडली आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी स्पर्धेत आठ थर रचले जात असताना सातव्या थरावरील एक गोविंदा खाली पडला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तो उपचाराधीन आहे.

दरम्यान, सरकारकडून वारंवार सर्व गोविंदा पथकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येते. प्रत्येक वर्षी अशा जखमी होण्याच्या घटना समोर येतात. त्यामुळे विमा योजना सुरू करून सरकारकडून जखमी गोविंदांचा खर्च उचलला जातो.

logo
marathi.freepressjournal.in