Mumbai : दाऊद इब्राहिमच्या जुन्या घरावर अखेर हातोडा; भेंडी बाजारात BMC ची तोडक कारवाई सुरू; मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

मुंबईतील भेंडी बाजारात कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या जुन्या घराशी संबंधित मुसाफिरखाना इमारतीवर महापालिकेने पाडकाम सुरू केलं आहे. मोठा पोलिस बंदोबस्त असून, प्रार्थनागृहाच्या पाडकामाला स्थानिकांचा विरोध आहे.
Mumbai : दाऊद इब्राहिमच्या जुन्या घरावर अखेर हातोडा; भेंडी बाजारात BMC ची तोडक कारवाई सुरू; मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
Published on: 

मुंबई : मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटांच्या कटाशी संबंधित कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचे वडिलोपार्जित घर आणि कार्यालय असलेल्या इमारतीवर अखेर मुंबई महापालिकेने हातोडा चालवला आहे. भेंडी बाजारातील पाकमोडिया स्ट्रीटवरील हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना या इमारतीच्या पाडकामाला गुरुवारी (दि. १९) सकाळी सुरुवात करण्यात आली. ही इमारत अतिधोकादायक घोषित करण्यात आली असून, मोठ्या पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू आहे. मात्र, तळमजल्यावरील प्रार्थनागृहाच्या पाडकामाला स्थानिकांकडून विरोध होत आहे.

अतिधोकादायक इमारतीवर कारवाई

भेंडी बाजारातील ही जुनी इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने तिला सी-१ श्रेणीतील अतिधोकादायक इमारत घोषित केलं आहे. महापालिकेच्या सी विभाग कार्यालयाने १६ नोव्हेंबर रोजी पाडकामाची नोटीस जारी केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या ३१ ऑगस्ट २०२० रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात येत आहे.

बुधवारी रखडलेलं पाडकाम गुरुवारी सुरू

या इमारतीवरील कारवाई बुधवारी (दि. १८) होणार होती. मात्र, काही कारणांमुळे ती पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर महापालिका मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत कायदेशीर प्रक्रिया, पाडकामाचं नियोजन आणि सुरक्षेबाबत चर्चा करण्यात आली. अखेर गुरुवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात झाली.

प्रार्थनागृहाच्या पाडकामाला विरोध

महापालिकेने इमारतीच्या वरच्या जीर्ण भागांचं पाडकाम सुरू केलं आहे. मात्र, तळमजल्यावरील मशिदीचा मुख्य भाग सध्या कारवाईतून वगळण्यात आला आहे. स्थानिकांकडून या भागाच्या पाडकामाला विरोध होत असून, प्रार्थनागृहाचा वापर करणाऱ्यांना पर्यायी जागेत स्थलांतर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दाऊद इब्राहिमशी काय संबंध?

दाऊद इब्राहिम आणि त्याचं कुटुंब पूर्वी या इमारतीत राहत असल्याचं सांगितलं जातं. तसेच १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांच्या कटाशीही या ठिकाणाचा संबंध असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या कारवाईकडे विशेष लक्ष लागलं आहे.

दरम्यान, द हिंदूच्या वृत्तानुसार, ही इमारत सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टच्या भेंडी बाजार पुनर्विकास प्रकल्पात येते. तिचा काही भाग प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाच्या मार्गातही येत आहे. सध्या महापालिकेकडून मोठ्या पोलिस बंदोबस्तात इमारतीच्या जीर्ण भागांवर पाडकामाची कारवाई सुरू आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)