मुंबई : मुंबईतील दादर रेल्वे स्थानक हे नेहमी प्रवाशांनी गजबजलेलं असतं. याच रेल्वे स्थानकात सोमवारी एका बॅगेत रक्ताने माखलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. रेल्वे स्थानकात ड्युटीवर असलेल्या RPF जवानाच्या सतर्कतेमुळे या हत्येचं गूढ समोर आलं आहे. तसेच पोलिसांनी देखील तत्परतेने सदर हत्येची उकल करून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
दादर रेल्वे स्थानकात सोमवारी फलाट क्रमांक ११ वर एक व्यक्ती मोठी बॅग ओढून नेत होती. बॅगेचं वजन जास्त असल्याने ती ओढताना त्याची खूप दमछाक झाली आणि त्याला घाम सुद्धा फुटला. यावेळी फलाटावर गस्त घालतं असलेले RPF जवान संतोषकुमार यादव यांना सदर व्यक्तीवर संशय आला. तेव्हा RPF जवानाने बॅग घेऊन जाणाऱ्या व्यक्तीस रोखले आणि त्याच्या समोरचं बॅग खोलून पाहिली. यावेळी बॅगेत रक्ताने माखलेला मृतदेह पाहून सर्वांनाच धक्का बसला. यावेळी सदर व्यक्ती हा तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करत होता तेवढ्यात इतर RPF जवानांनी त्याला पकडले. मृतदेह असलेली बॅग आणि बॅग घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
कोणाचा होता मृतदेह?
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सदर मृतदेह हा अर्शद अली सादीक अली शेख (वय ३०) या व्यक्तीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेख हा सांताक्रुझ कलिना परिसरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. दादर रेल्वे पोलिसांनी मृतदेह असलेली बॅग घेऊन जाणारा व्यक्ती प्रवीण चावडा याला ताब्यात घेतले आहे. हत्येचा अधिक तपास केला असता शिवजीत कुमार सिंह या व्यक्तीने त्याचा मित्र जय प्रवीण चावडा याच्या मदतीने अर्शद अली सादीक अली शेखची हत्या केली असल्याचे उघड झाले आहे. शिवजीत कुमार सिंह हा उल्हासनगर येथील रहिवासी असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. बॅगेत मृतदेह भरून तो कोकणात नेऊन त्याची विल्हेवाट लावण्याचा आरोपींचा प्लॅन होता.