
मीरा-भाईंदरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि मराठी संघटनांनी पुकारलेल्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं. तरीही मराठी भाषिकांनी आंदोलन केल्याने पोलिसांनी कारवाई करत आंदोलकांना ताब्यात घेतल्याने परिस्थिती चिघळली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत मोर्चाला परवानगी नाकारण्यामागचं कारण स्पष्ट केलं.
मोर्चाला परवानगी का दिली नाही? यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की ''मी पोलिसांना विचारलं, की मोर्चाला परवानगी का दिली नाही? मला आयुक्तांनी सांगितलं की त्यांच्याशी रूटच्या संदर्भात चर्चा सुरू होती. परंतु, ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा रूट मागत होते की ज्यामधून कुठेतरी संघर्ष होईल. पोलिसांचं म्हणणं असंही होतं की या संदर्भात काही लोकांबद्दल त्यांच्याकडे इनपुटस आले होते, की त्यांना त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची कारवाई करायची आहे. म्हणून पोलिसांनी त्यांना एवढंच सांगितलं होतं, की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो घ्या अशाप्रकारचं रूट घेऊ नका. पण, त्यांनी त्यांना नकार दिला. आम्ही हाच रूट घेणार. दुसऱ्या रूटवर जाणार नाही. म्हणून पोलिसांनी ती परवानगी नाकारली असं मला आताच सीपीनी सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
जर परावनगी मागितली तर..
तर, मोर्चा काढायचा असेल तर परवानगी मिळेल का? यावर फडणवीस यांनी सांगितले, की ''तथापि जर मनसेच काय कोणालाही मोर्चा काढायचा असेल आणि परवानगी हवी असेल तर ती परवानगी मिळेल. मात्र, आम्हाला इथेच काढायचाय, असाच काढायचा आहे अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था ही बिघडवण्याकरता जर जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाहीये. शेवटी आपल्याला सगळ्यांना एकाच राज्यांमध्ये एकत्रितपणे राहायचं आहे. विकासाचा विचार करायचा आहे. त्यामुळे योग्य रूट देऊन त्यांनी जर परावनगी मागितली तर ती कधीही मिळेल. आजही मिळेल, उद्याही मिळेल.''
व्यापाऱ्यांना परवानगी कशी मिळाली?
''व्यापाऱ्यांना परवानगी दिली जाते आम्हाला दिली जात नाही'' या आंदोलकांच्या टीकेवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, ''या विषयी मीही सीपींना विचारलं. त्यावर त्यांनी सांगितलं की जो रूट दिला त्यावर जुना मोर्चा निघाला. त्यांनी कोणत्याही रुटचा आग्रह केला नाही. यांनी विशिष्ट रूट मागितला की जिथे मोर्चा काढणं कठीण आहे. त्यांनी काल रात्री आम्हाला सभा घ्यायची आहे अशी मागणी केली. त्याचीही परवानगी दिली. ठीक आहे सभा घ्या. पण त्यांना स्पेसिफीक अशा ठिकाणीच तो मोर्चा न्यायचा होता, की ज्यातून काही अडचणी निर्माण झाल्या असत्या. कायदा सुव्यवस्था निर्माण झाला असता. आता इतके वर्ष आपण सगळेच मोर्चे काढतो. मोर्चा काढताना आपण पोलिसांशी चर्चा करून रूट ठरवत असतो. आपण ज्यावेळेस ५ तारखेचा मोर्चा दोन संघटनांनी काढायचा ठरवला होता, तर मुंबईत त्यांच्याशी चर्चा होऊन रूट ठरला होता. कुठला रूट असणार आहे?''
मोर्चा काढायला कोणाचाही ना नाहीये -
पुढे ते म्हणाले, ''मोर्चा काढायला कोणाचाही ना नाहीये. जर कायदा सुव्यवस्थेत गडबड होणार असेल किंवा ट्रॅफिक कंट्रोल करणं कठीण आहे. आता तो रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर रेल्वे स्टेशनवर आपल्याला माहिती मीरा-भाईंदरचा रेल्वे स्टेशनची काय परिस्थिती असते. त्यामुळे पोलिसांनी सातत्याने त्यांना विनंती केली, की तुम्ही हा रोड बदला. पण, ते मोर्चाचा रोड बदलायला तयार नव्हते,'' असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.