... तोपर्यंत काँग्रेसला भवितव्य नाही! मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल

सोशल मीडियातील हवेतील राजकारण काँग्रेस करतेय, जोपर्यंत काँग्रेसच्या उच्च नेतृत्वाला भारतातील मतदारांची नाडी समजत नाही. मतदारांची मानसिकता समजत नाही, तोपर्यंत काँग्रेसला भवितव्य नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर जोरदार हल्लाबोल केला.
... तोपर्यंत काँग्रेसला भवितव्य नाही! मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
Published on

मुंबई : सोशल मीडियातील हवेतील राजकारण काँग्रेस करतेय, जोपर्यंत काँग्रेसच्या उच्च नेतृत्वाला भारतातील मतदारांची नाडी समजत नाही. मतदारांची मानसिकता समजत नाही, तोपर्यंत काँग्रेसला भवितव्य नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर जोरदार हल्लाबोल केला.

बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. तरीही आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसतर्फे स्वबळाचा नारा काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिला आहे. “काँग्रेसने मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवली किंवा महाविकास आघाडीत लढवली तरी फार काही परिणाम होणार नाही. काँग्रेसचे उच्च नेतृत्व जोपर्यंत भारतातील मतदारांच्या नाडी समजत नाही, मतदारांची मानसिकता समजत नाही, जमिनीवर उतरून खऱ्या प्रश्नांवर राजकारण करत नाही. सोशल मीडियातील हवेतील राजकारण करतील तोपर्यंत काँग्रेसला भवितव्य नाही,” अशा शब्दांत फडणवीस यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाचा समाचार घेतला.

लोकांच्या मनात मोदी!

बिहार निवडणुकीनंतर इंडिया आघाडीत काहीही आलबेल नाही. इंडिया आघाडीने एकत्र निवडणूक लढवली, स्वबळावर निवडणूक लढवली, परंतु पदरी निराशाच आली. भाजपने विकासकामांवर लक्ष केंद्रित केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामामुळे लोकांच्या मनात मोदी आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

भाजपमधील बंडखोरांशी चर्चा करून त्यांचे समाधान करू!

बंडखोरी ही प्रत्येक पक्षात होते. परंतु भाजपमधील बंडखोरांशी चर्चा करून त्यांचे समाधान करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्यात नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. राज्यात तीन ते चार तर काही ठिकाणी सात वर्षांनंतर निवडणुका होत आहेत. त्यामुळे निवडणुकीत उमेदवारी मिळावी, ही प्रत्येकाची इच्छा असते. पक्षातून उमेदवारी नाही मिळाली तर बंडखोरी होते. हे प्रत्येक पक्षात होते. भाजप पक्षातही काही बंडखोरीच्या तयारीत असतील तर त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांचे समाधान करण्यात येईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

काँग्रेस संपवणारा अजून जन्मला नाही - सपकाळ

बिहार निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस संपल्यासंबंधी केलेल्या विधानाचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी खरपूस समाचार घेतला आहे. “काँग्रेस हा भारताच्या डीएनएतून तयार झालेला व कसलेला विचार आहे. हा विचार चंद्र, सूर्य असेपर्यंत कायम राहील. त्यामुळे काँग्रेसला संपवणारा अजून कुणीही जन्माला आला नाही,” अशी टीका सपकाळ यांनी मोदींवर केली.

logo
marathi.freepressjournal.in