मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी म्हाडाच्या विविध मंडळांकडून लॉटरीच्या जाहिरातींचा धमाका होणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत सुमारे ८ हजार घरांच्या लॉटरीची जाहिरात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढण्याची लगबग सुरू आहे. या लॉटरीसाठी अधिक अर्ज यावेत याकरिता मंडळाने अर्ज भरताना बंधनकारक असलेली डोमेसाईल सर्टिफिकेटची अट शिथिल करण्याचा प्रस्ताव म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवला असल्याची माहिती वरिष्ठ अधिकारी यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी काढण्यात येणार आहे. या लॉटरीत अपयशी ठरणाऱ्या नागरिकांना अर्ज करण्याची आणखी एक संधी कोकण मंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार कोकण मंडळाने लॉटरीची तयारी सुरू केली असून ती अंतिम टप्प्यात पोहचली आहे. मंडळामार्फत दोन लॉटरी काढण्यात येणार आहेत. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या लॉटरीची जाहिरात ३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामध्ये खासगी बिल्डरांकडून म्हाडाला प्राप्त झालेल्या ९१३ घरांचा समावेश करण्यात आला आहे. यात ठाणे, टिटवाळा, वसई परिसरातील घरांचा समावेश असेल. तसेच कोकण मंडळाच्या विविध ठिकाणच्या ७ हजारांहून अधिक घरांच्या लॉटरीची जाहिरात ८ ऑक्टोबरला काढण्यात येणार आहे.
विजयी झाल्यानंतर डोमेसाईल बंधनकारक
या लॉटरीला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी अर्ज भरतेवेळी डोमेसाईल सर्टिफिकेटशिवाय अर्ज करण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव मंडळाने म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवला आहे. त्यामध्ये विजेत्याने लॉटरीनंतर डोमेसाईल प्रमाणपत्र मंडळाला सादर करण्यास परवानगी देण्याचे नमूद केले आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी अर्जदारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे ही अट अर्ज करतेवेळी शिथिल केल्यास अर्ज मोठ्या संख्येने येतील, असा विश्वास मंडळातील अधिकाऱ्यांना आहे.