

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (दि.२४) ठाकरे बंधूंची युती जाहीर होताच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली होती. "ठाकरेंनी मुंबईसाठी, मराठी माणसांसाठी, गिरणी कामगारांसाठी काय केले?" असा थेट सवाल शिंदे यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
गुरुवारी (दि.२५) सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. २०२० मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबई आणि गिरणी कामगारांबाबत झालेल्या निर्णयांचा लेखाजोखा एकनाथ शिंदे यांनीच यापूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता, याकडे लक्ष वेधत अंधारेंनी शिंदेंना लक्ष्य केले.
“उद्धव साहेबांनी मुंबई आणि मुंबईतील मराठी माणसासाठी काय केलं, याचा लेखाजोखा तुम्हीच स्वतः मांडत आहात. फक्त पोस्ट डिलीट करू नका. तुम्हाला तुमचे गुरु आनंद दिघे यांची शपथ आहे!” असा थेट इशारा सुषमा अंधारेंनी एकनाथ शिंदेंना दिला.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या पोस्टमध्ये काय होतं?
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या पोस्टमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गिरणी कामगारांच्या घरांबाबत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीचा उल्लेख होता. बैठकीला पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे ,माजी राज्यमंत्री सचिन अहिर, माजी आमदार सुनील शिंदे, मुख्य सचिव अजोय मेहता, गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर उपस्थित होते. अशी माहिती देत एकनाथ शिंदे यांनी बैठकीचे फोटो शेयर केले होते.
एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
"मराठी माणसाला साद घालणारे उद्धव ठाकरे यांना मराठी माणूस आताच आठवतो का?" असा सवाल करत शिंदे म्हणाले होते, "मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला, त्याचे खच्चीकरण झाले तेव्हा हे मुद्दे का उपस्थित झाले नाहीत. निवडणुका आल्या की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ देणार नाही, अशा घोषणा दिल्या जातात, पण प्रत्यक्षात ठाकरेंनी गिरणी कामगारांसाठी काय केले?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.
"आम्ही साडेबारा हजार गिरणी कामगारांना घरे दिली असून, एक लाख गिरणी कामगारांना घरे देण्याचे काम सुरू आहे. क्लस्टर योजनेतून ३५ ते ४० लाख लोकांना टप्प्याटप्प्याने सामावून घेतले जाईल. विरोधकांकडे मुंबईकरांसाठी कोणती ठोस योजना आहे का?" असा सवाल करत त्यांनी म्हटले होते की, "मुंबईकर सुज्ञ आहेत आणि या निवडणुकीत त्यांना विकास हवा आहे. फक्त स्वतःसाठी काय मिळवायचं, हा विचार करूनच काही लोक एकत्र आले आहेत. ही युती स्वार्थासाठी आणि खुर्चीसाठी आहे,” अशी घणाघाती टीकाही एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर केली होती.
या पार्श्वभूमीवर, शिंदे आणि ठाकरे गटामधील आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होत असून, मुंबई महानगरपालिका निवडणुकीआधी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.