विधान परिषद निवडणुकीतही चुरस

रिक्त १० जागांपैकी सहा जागा महाविकास आघाडीच्या, तर चार जागा भाजपच्या वाट्याला येणार
विधान परिषद निवडणुकीतही चुरस

राज्यसभेची जुळवाजुळव सुरू असतानाच आता विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. काँग्रेस आणि भाजपने बुधवारी उमेदवारांची नावे जाहीर केली, तर शिवसेनेच्या उमेदवारांनी थेट आपले उमेदवारी अर्जच दाखल केले. चार जागा निवडून येण्याचे संख्याबळ असताना भाजपने पाच उमेदवारांची नावे जाहीर केल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे.

विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जून रोजी मतदान होत असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटी तारीख गुरुवार, ९ जून आहे. या १० जागांसाठी भाजप, शिवसेना आणि काँग्रेस यांनी आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असून, शिवसेनेकडून नंदुरबारचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर दुसऱ्या जागेवर माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांना संधी दिली गेली आहे.

रिक्त १० जागांपैकी सहा जागा महाविकास आघाडीच्या, तर चार जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत. काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या दोन जागांसाठी मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप, माजी राज्यमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या नावाची दिल्लीतून घोषणा करण्यात आली. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाई जगताप यांना काँग्रेसकडून संधी दिली गेली आहे. भाजपच्या वाट्याच्या चार जागांसाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

...तर विधान परिषद बिनविरोध

राज्यसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे; मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सहावा उमेदवार विजयी झाल्यास विधान परिषेदची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in