मुंबई : म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाशी नामसाधर्म्य असणारे बनावट अनधिकृत संकेतस्थळ तयार करण्यात आले असून या माध्यमातून काही नागरिकांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार म्हाडा प्रशासनातर्फे बनावट संकेतस्थळ निर्माण करणार्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अज्ञात व्यक्तींनी म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळासारखे दिसणारे हुबेहुब बनावट अनधिकृत संकेतस्थळ mhada.org या नावे तयार केले आहे. बनावट संकेतस्थळाचे होम पेज, पत्ता व पहिल्या पानावरील संकेतस्थळाची रचना म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळासारखीच आहे. मात्र, या बनावट संकेतस्थळावर अर्ज प्रक्रिया न राबविता थेट पेमेंटचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
म्हाडाचे घर मिळवून देण्याचे आश्वासन देत सदर अज्ञात व्यक्तींनी फसवणूक झालेल्या व्यक्तीस बनावट संकेतस्थळ व त्यावरील उपलब्ध पेमेंट लिंकबाबत माहिती दिली. त्यांनी म्हाडाच्या प्रकल्पातील सदनिकेच्या एकूण विक्री किंमतीपैकी ५० हजार इतकी रक्कम या बनावट संकेतस्थळावरून दिलेल्या लिंकवरून ऑनलाइन भरून घेण्यात आली. तसेच याच बनावट संकेतस्थळावरून बनावट पावतीही उपलब्ध करून दिल्याचा प्रकार घडला आहे. म्हाडातर्फे नुकतीच मुंबईतील विविध गृहप्रकल्पातील २ हजार ३० घरांची लॉटरी जाहीर केली आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी राज्यातील इच्छुक अर्जदारांना सावधानतेचा इशारा दिला आहे.