मुंबई : थर्टी फर्स्टचा जल्लोष, नवीन वर्षांचे स्वागत यात मुंबईकरांसह पर्यटक न्हाहून निघतात. थर्टी फर्स्ट अन् नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी बहुतांश मुंबईकर हॉटेल-रेस्टॉरंट क्लबमध्ये चमचमीत पदार्थांवर ताव मारतात. मात्र, हॉटेल्स, रेस्टॉरंट, क्लबमध्ये येणाऱ्या ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ दिल्याचे निदर्शनाला येताच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाने दिला आहे. दरम्यान, अन्न सुरक्षा अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि खाद्य आस्थापनांची सखोल तपासणी करतील, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले आहेत.
मुंबईत रात्रभर जल्लोष
जगभरात २५ डिसेंबरपासून नाताळ सुरू झाला असून ३१ डिसेंबरला २०२५ या वर्षाला निरोप देण्यासाठी थर्टी फर्स्ट आणि २०२६ या नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी मुंबईकर पर्यटक ३१ डिसेंबरला रात्रभर जल्लोष करतात. ३१ डिसेंबर वर्षांचा अखेरचा दिवस आणि १ जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात या पार्श्वभूमीवर मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला जातो. या दिवशी नागरिक मोठ्या प्रमाणात हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब या ठिकाणी जाऊन अन्न पदार्थांचा आस्वाद घेत असतात.
ग्राहकांच्या आरोग्याशी खेळाल तर याद राखा
नववर्षानिमित्त अन्न पदार्थांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढते. या दिवशी अन्न पदार्थांच्या मागणीत वाढ होत असून ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे अन्न पदार्थ दिले जाऊ नये, यासाठी एफडीएच्या टीम मुंबईभर तपासणी करणार आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हॉटेलमधील स्वच्छतेला विशेष महत्त्व असून या संदर्भात हॉटेल व्यावसायिकांमध्ये जनजागृती व प्रबोधन करावे. तपासणीदरम्यान मुदतबाह्य कच्च्या मालाचा वापर, अन्न पदार्थांमध्ये खाद्य व अखाद्य रंगांचा वापर तसेच स्वच्छतेच्या निकषांचे पालन होत आहे की नाही, याची काटेकोर तपासणी केली जाईल. यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभर मोठी मोहीम हाती घेतली आहे.
उत्कृष्ट हॉटेल्सना पुरस्कार
उत्तम स्वच्छता व अन्नसुरक्षा मानकांचे पालन करणाऱ्या हॉटेल आस्थापनांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा व राज्यस्तरावर उत्कृष्ट हॉटेल्सना पुरस्कार देण्यात येणार आहेत. जिल्हास्तरावरील पुरस्कार २६ जानेवारी २०२६ रोजी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील तर राज्यस्तरावर उत्कृष्ट ठरलेल्या हॉटेल्सचा सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती झिरवाळ यांनी दिली.
विशेष मोहीम
मंत्री झिरवाळ यांच्या संकल्पनेतून ‘स्वागत नववर्षाच्, संकल्प हॉटेल स्वच्छतेचा’ हा विशेष उपक्रम २६ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत राज्यभर राबवण्यात येत आहे. या मोहिमेचा सविस्तर अहवाल मंत्री कार्यालयात सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.