
मुंबई : अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरता आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. त्यानुसार २२ मे रोजी दुपारी ३ वाजता पहिल्या फेरीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
शिक्षण संचालनालयाने १९ व २० मे रोजी सराव अर्ज उपलब्ध करण्यात आले होते. त्यानंतर २१ मे ते १३ जून या कालावधीत पहिल्या फेरीसाठी विद्यार्थी नोंदणी, प्राधान्यक्रम व उच्च माध्यमिक विद्यालयांची अलॉटमेंटचे वेळापत्रक जाहीर केले होते.
मात्र २१ मे २०२५ रोजी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे संकेतस्थळ हे तांत्रिक कारणास्तव बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना नोंदणी व प्राध्यान्यक्रम भरणे शक्य झाले नाही. परिणामी विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक २२ मे २०२५ दुपारी ३ वाजता पहिल्या फेरीचे सविस्तर वेळापत्रक घोषित करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.
संकेतस्थळ सुरू होण्याची वेळ कळविणार
अकरावी प्रवेशाचे संकेतस्थळ सायंकाळी विलंबाने सुरू झाले तरी त्यावर अर्ज नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे संकेतस्थळ सुरू झाले तरी विद्यार्थ्यांना अर्ज करता येत नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांना पोर्टल सुरु होण्याची वेळ ऑनलाईन दर्शविण्याबरोबरच ई-मेल व मोबाईल संदेशाद्वारे कळविण्यात येणार आहे. त्रुटीसह अर्ज भरण्याचे सुविधा देण्याऐवजी संकेतस्थळ सुलभ व त्रुटीरहित करून सुरु करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचेही डॉ. महेश पालकर यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.