
आधीच शाहरुख खानच्या 'पठाण'वरून गदारोळ सुरु असताना आता २६ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांच्या 'गांधी - गोडसे एक युद्ध' (Gandhi- Godse Ek Yudh) हा चित्रपटही वादात अडकला आहे. हा वाद इतका वाढला आहे की, चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याप्रकरणी, राजकुमार संतोषी यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. तसेच, पोलिसांकडे अतिरिक्त सुरक्षेची मागणी केली आहे. त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.
दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी माझ्यासोबतच माझ्या कुटुंबालाही धोका असल्याचे म्हटले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, "२० जानेवारीला चित्रपटाच्या टीमसोबत पत्रकार परिषद घेतली होती. ही पत्रकार परिषद उधळून लावण्याचा प्रयत्न केला गेला. मुंबईतील अंधेरी परिसरात पत्रकार परिषद सुरू असताना एका गटाने तिथे येऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे चित्रपटाच्या टीमला पत्रकार परिषद मध्येच थांबवावी लागली."
अधिक माहितीसाठी हेही वाचा :
Gandhi- Godse Ek Yudh : 'काश्मीर फाईल्स'नंतर चिन्मय मांडलेकर दिसणार नथुराम गोडसेच्या भूमिकेत
यादिवशी झालेल्या 'गांधी गोडसे: एक युद्ध'च्या पत्रकार परिषदेत काही व्यक्तींनी काळे झेंडे फडकावत 'महात्मा गांधी झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या होत्या. यावेळी त्यांनी दावा केला होता की, हा चित्रपट महात्मा गांधींना कमी लेखत आहे. तर याउलट त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेचा यांच्या विचारांचा गौरव करत आहे. या पत्रकार परिषदेत कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.