मुंबई : मूर्तिमंत चैतन्य, उत्साहाचे प्रतीक असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाची गणेश चतुर्थीच्या दिवशी मुंबईसह राज्यात घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात आली. त्याचबरोबर विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या भव्य गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गणरायाच्या आगमनामुळे सर्वत्र भक्तीभावाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच संपूर्ण राज्य 'गणपती बाप्पा मोरया' च्या गजरात न्हाऊन निघाले आहे.
गणपतीची घरात प्रतिष्ठाना होणार असल्याचे घराघरात पहाटेपासून कामाला सुरुवात झाली होती. सकाळी बाप्पाची मूर्ती आणायला जाताना भाविक दिसत होते. वाजत-गाजत ढोल-ताशांच्या गजरात भाविक घरी मूर्ती आणत होते. रस्त्यारस्त्यात 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर सुरू होता. घराबाहेर रांगोळी घातली होती. तसेच ब्रह्मवृंदाकडून गणपतीची प्रतिष्ठापना केली जात होती. त्यानंतर आरत्या म्हटल्या जात होत्या. बाप्पाला नैवैद्यासाठी वरण, भात, मोदक, पुरणपोळी, बासुंदी आदी मिठ्ठान्न पदार्थ होते.
पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती, ठाण्याचा कोपिनेश्वर गणपती या भागांतही उत्साहाचे वातावरण होते. राज्यभरातील पोलीस प्रशासनाने मोठ्या संख्येने सुरक्षा बंदोबस्त तैनात केला आहे. वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरकतेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. राज्यातील अनेक घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांनी शाडूच्या मूर्ती, नैसर्गिक रंग, तसेच कागद-मातीच्या सजावटीचा वापर करून बाप्पाला हरित संदेश दिला आहे. अनेक मंडळांनी प्लास्टिकमुक्त सजावट, तसेच पाणी बचतीसाठी कृत्रिम तलावात विसर्जनाची व्यवस्था केली आहे.
गणेशोत्सवात हा केवळ धार्मिक सोहळा नसून तो सामाजिक ऐक्याचा, संस्कृतीचा आणि कला-परंपरेचा उत्सव असल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. विविध मंडळांतर्फे आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, शैक्षणिक व पर्यावरणपूरक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दरवर्षीप्रमाणेच या वर्षीदखील गणेशोत्सव दहा दिवस अत्यंत उत्साहात साजरा होणार आहे.
राजकीय नेत्यांच्या घरीही बाप्पांचे आगमन
सर्वसामान्य लोकांबरोबर उपराष्ट्रपती पदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी 'रालोआ'चे उमेदवार व राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी बुधवारी सकाळी राजभवन येथील आपल्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली. यावेळी राज्यपालांनी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांचेसह गणरायाची आरती केली तसेच देशवासियांना गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' बंगल्यावर बाप्पा विराजमान झाले आहेत. राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणपतीची प्रतिष्ठापना झाली. यंदा २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या काळात गणेशोत्सव साजरा होणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवात प्रचंड गर्दी
मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव हे विविध देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. भारतात प्रसिद्ध असलेल्या 'लालबागच्या राजा'ची बुधवारी पहाटे पाच वाजता पारंपारिक विधीवत प्राणप्रतिष्ठा पूजा झाली आहे. त्यानंतर सकाळी सहा वाजल्यापासून लालबाग राजाचे दर्शन भाविकांसाठी सुरु करण्यात आले आहे. 'लालबागच्या राजा'चे यंदाचे हे ९२ वे वर्ष आहे. लालबागच्या 'गणेश गल्लीच्या राजा'ची विधिवत पूजा प्राणप्रतिष्ठापना झाली. यंदा या मंडळाच्या गणेशोत्सवाचे 98 वे वर्ष आहे. या मंडळाने यंदा सजावटीसाठी रामेश्वरमधील रामनाथ स्वामी मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. चिंतामणी, चिंचपोकळीचा राजा, जीएसबी सेवा मंडळ आदी सार्वजनिक गणपतींचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी उसळली आहे.