

मुंबई : ‘गेट वे’ ते एलिफंटा-दरम्यान प्रवास करणाऱ्या “नीलकमल” या प्रवासी बोटीला बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास नौदलाच्या बोटीने धडक दिल्याने भीषण दुर्घटना घडली. उरण करंजाजवळ घडलेल्या या दुर्घटनेत १३ प्रवाशांना जलसमाधी मिळाली आहे, तर ४ जण अत्यवस्थ आहेत. ९९ प्रवाशांना सुखरूप वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे.
या दुर्घटनेत वाचवण्यात आलेल्यांवर जेएनपीटी रुग्णालय, नेव्ही डॉकयार्ड रुग्णालय, सेंट जॉर्ज रुग्णालय, अश्विनी रुग्णालय आणि एनडीके रुग्णालय, मोरा येथे प्राथमिक उपचार करण्यात आले, अशी माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
गेट वे ते एलिफंटादरम्यान फेरीबोटीची वाहतूक करणाऱ्या ‘नीलकमल’ या बोटीला प्रवासादरम्यान दुपारी साडेतीनच्या सुमारास अपघात झाला. या बोटीची क्षमता सुमारे ८० प्रवाशांची होती, मात्र तरीही बोटीत शंभराहून अधिक प्रवाशी प्रवास करीत होते.
गर्दीच्या मार्गावर चाचण्यांना परवानगी कशी दिली?
जहाज क्षेत्रातील तज्ज्ञांनी भारतीय नौदलाच्या निष्काळजीपणाच्या वृत्तीवर बोट ठेवले आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या अतिशय गर्दीच्या ठिकाणी स्पीड बोटीच्या चाचण्यांना नौदलाने परवानगी कशी दिली? असा सवाल या क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला.
नौदलाच्या पश्चिम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नौदलाच्या कर्मचाऱ्यांना ही स्पीड बोट हाताळता आली नाही. ही बोट प्रवासी बोटीला धडकली. यातूनच प्रशिक्षणाचा दर्जा घसरल्याचे दिसून येत आहे. आता भारतीय नौदलाच्या महत्वाच्या पश्चिम विभागाकडे सुधारणा करणे गरजेचे आहे. या अपघाताचे चित्रीकरण केलेल्या व्हीडिओतून ही स्पीड बोट बेदरकारपणे चालवत असल्याचे दिसून आले. या वेगवान बोटीने प्रवासी बोटीला जोरदार धडक दिली. यामुळे अनेक प्रवासी पाण्यात पडले.
या बचाव कार्यात नौदलासह जेएनपीटी, तटरक्षक दल, यलो गेट पोलीस ठाणे, स्थानिक मच्छीमार सहभागी झाले होते. नौदलाच्या ११ बोटी, तीन मरीन पोलिसांच्या बोटी, १ तटरक्षक दलाची बोट मदत कार्यात सहभागी झाली होती, असे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी सांगितले.
तटरक्षक दलाने यंत्रणा उभी करणे गरजेचे - जयंत पाटील
एलिफंटा येथे राज्यातूनच नव्हे तर देशातून आणि परदेशातून पर्यटक येत असतात. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि बोटींच्या सुरक्षिततेसाठी मेरीटाईम बोर्ड आणि तटरक्षक दलाने यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत याची दक्षता प्रशासनाने घेतली पाहिजे, असे माजी आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.
पाच लाखांची मदत
या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा फडणवीस यांनी केली.
इंजिनातील बिघाडामुळे अपघात
नौदलाच्या बोटीला नवीन इंजिन लावले होते. त्या इंजिनाची चाचणी घेतली जात होती. त्या चाचणीच्या वेळी इंजिनात बिघाड झाला. त्यामुळे चालकाचा बोटीवरील ताबा सुटला. त्यानंतर भरधाव बोट नीलकमल बोटीवर आदळली आणि अपघात झाला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नौदलाच्या स्पीडबोटीने दिली धडक
घटनास्थळावरून ‘नीलकमल’ या बोटीचे मालक राजेंद्र पडते यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे सव्वातीन वाजताच्या सुमारास गेट वेवरून निघालेली ही बोट एलिफंटाला जात असताना वाटेत नौदलाच्या स्पीडबोटीने जोरदार धडक दिली. यामुळे बोट पाण्यात उलटली. बोटीवर प्रवाशांसह ५ क्रू मेंबर्स होते. सर्व प्रवाशांना बोट व्यवस्थापनाकडून जीव रक्षक जॅकेट देण्यात आले होते. मात्र, ही बोट उलटल्यानंतर सर्व प्रवासी पाण्यात पडले.
बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी
गेट वे ते एलिफंटादरम्यान जाणाऱ्या ‘नीलकमल’ या बोटीची ८४ प्रवासी क्षमता आहे. मात्र, या बोटीत शंभरावर प्रवासी होते, असे समजते. घटना घडल्यानंतर बोट मालक राजेंद्र पडते यांनी बोटीत ८० प्रवासी तर ५ क्रू मेंबर्स असल्याची माहिती दिली. मात्र, प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत एकूण ११६ अपघातग्रस्त आहेत.
मृतांची नावे
१) महेंद्रसिंग शेखावत (नौदल) २) प्रवीण शर्मा (कामगार)
३) मंगेश (कामगार) ४) मोहम्मद रेहान कुरेशी
५) राकेश नानाजी अहिरे ६) साफियाना पठाण ७) माही पावरा
८) अक्षता राकेश अहिरे ९) मिथू राकेश अहिरे
१०) दीपक व्ही.अन्य तिघांची ओळख पटलेली नाही.
दरम्यान, मृतांमध्ये १० सामान्य नागरिक असून तीन जण नौदलाचे कर्मचारी होते.