‘गेट वे’ बोट दुर्घटना: बेपत्ता प्रवाशांच्या शोधासाठी हेलिकॉप्टर, ८ बोटी तैनात, मृतांचा आकडा १४ वर

Gateway boat Accident : ‘गेट वे’ प्रवासी बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ झाला असून बेपत्ता असलेल्या दोन प्रवाशांचा शोध घेण्यासाठी नौदलाचे हेलिकॉप्टर आणि नौदल व तटरक्षक दलाच्या ८ बोटी तैनात करण्यात आल्याचे गुरुवारी एका अधिकाऱ्याने सांगितले.
‘गेट वे’ बोट दुर्घटना: बेपत्ता प्रवाशांच्या शोधासाठी हेलिकॉप्टर, ८ बोटी तैनात, मृतांचा आकडा १४ वर
Published on

मुंबई : ‘गेट वे’ प्रवासी बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ झाला असून बेपत्ता असलेल्या दोन प्रवाशांचा शोध घेण्यासाठी नौदलाचे हेलिकॉप्टर आणि नौदल व तटरक्षक दलाच्या ८ बोटी तैनात करण्यात आल्याचे गुरुवारी एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथून बोटीने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना आता जीवरक्षक जॅकेट वापरणे बंधनकारक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

नौदल आणि तटरक्षक दलाच्या आठ बोटी दोन बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यासाठी तैनात करण्यात आल्या असून गुरुवारी दुसऱ्या दिवशीही शोधसत्र सुरूच होते.

जीवरक्षक जॅकेटबाबत प्रवाशांचे आक्षेप

दरम्यान, जीवरक्षक जॅकेट कसे वापरावे याची माहिती असल्यासच त्याचा वापर सुलभ होईल, असे काही प्रवाशांचे म्हणणे आहे. आपत्कालीन स्थितीत सदर जॅकेट कसे वापरावे याबाबत अधिकाऱ्यांनी प्रवाशांना सूचना द्याव्यात, असेही काही प्रवाशांनी म्हटले आहे.

नाशिकमधील तिघांचा दुर्घटनेत अंत

नाशिक येथील अहिरे कुटुंबातील तिघांचाही या दुर्घटनेत दुर्दैवी अंत झाला. राकेश अहिरे यांना दम्याचा विकार असल्याने ते त्यावरील उपचारासाठी पत्नी हर्षदा आणि पुत्र निधेश (५) यांच्यासह मुंबईत आले होते. मात्र, बोट दुर्घटनेत तिघांचाही बुडून मृत्यू झाला. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त बोटीची ९० प्रवासी क्षमता असताना या बोटीत १०० हून अधिक प्रवासी होते, असे मुंबई पोलिसांनी सांगितले.

‘गेट वे’ फेरीबोटींची जलवाहतूक पूर्वपदावर

गेट वे ते एलिफंटादरम्यान ‘नीलकमल’ या बोटीला झालेल्या अपघातात १३ जणांना जलसमाधी मिळाली, तर ९९ जणांना वाचवण्यात आले. दरम्यान, या दुर्घटनेला २४ तास उलटण्याच्या आतच गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटादरम्यानची प्रवासी जलवाहतूक पूर्वपदावर आली आहे. तसेच घडलेल्या दुर्घटनेनंतर या परिसरात पर्यटकांची पुन्हा मोठी गर्दी झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. मात्र, या वाहतुकीत सध्या बदल पाहायला मिळत आहे. पर्यटकांना अप्पर डेकवर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मेरिटाइम बोर्डाचे अधिकारी आणि कर्मचारी या जेटीवर उपस्थित असून, पर्यटकांना लाइफ जॅकेट परिधान करणे सक्तीचे करण्यात आले आहे.

याप्रकरणी पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, कुलाबा येथे ‘नीलकमल’ बोटीला बुधवारी नेव्हीच्या बोटीने धडक दिली. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन जण अद्याप बेपत्ता आहेत. नेव्हीच्या चालकावर आम्ही भरधाव वेगाने बोट चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यात १३ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची ओळख पटलेली आहे. मुंबई पोलीस, कोस्टल पेट्रोलिंग आणि इतर यंत्रणेच्या मदतीने शोधमोहीम अजूनही सुरू आहे. हसंराज सतराजी भाटी (४३ वर्षे), जोहान निसार अहमद (६ वर्षे) हे दोघे अद्याप बेपत्ता आहेत.

पोलिसांनी ९ जणांचे जबाब नोंदवले

‘गेट वे’ दुर्घटनाप्रकरणी ९ जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. या अपघाताच्यावेळी तीन परदेशी नागरिकही बोटीत होते. दोन जर्मनी आणि एक कॅनडाचा नागरिक होता. नौदलाच्या स्पीडबोटीवर ६ जण होते. त्यापैकी ४ नौदलाच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर दोन अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत.

नियम काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न - पर्यटक

जी दुर्घटना झाली तो एक अपघात होता. त्या अपघातामुळे आम्ही प्रवासाचे नियम काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच नियमानुसार आम्ही लाइफ जॅकेटही परिधान केले आहे. त्यामुळे आम्हाला भीती नाही. आम्ही पुन्हा एकदा नव्या जोमाने एलिफंटा गुहा पाहण्यासाठी निघालो आहोत, तर बोटीत ८० जण आहेत का याची आम्ही स्वतः हून खात्री करत आहोत, असे काही पर्यटकांनी सांगितले.

सखोल चौकशीसाठी समिती - नौदल

‘नीलकमल’ फेरीबोट अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यात नौदल क्राफ्टमधील चार कर्मचारी यामध्ये एक सेवा कर्मचारी आणि तीन ‘ओईएम’चे प्रतिनिधी यांचा मृत्यू झाला आहे. नागरी फेरीबोटीवरील नऊ जणांचा मृतांमध्ये समावेश आहे. फेरीबोटीवरील दोन व्यक्ती अद्याप बेपत्ता आहेत. भारतीय नौदलाचे सर्व कर्मचारी आणि अपघातात ज्यांनी जीव गमावला त्यांच्या कुटुंबीयांबाबत ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी सहवेदना व्यक्त केली. तसेच या अपघाताबाबत सखोल चौकशीसाठी समिती नेमण्यात आल्याचे सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in