‘अशा भयानक घटनेचे साक्षीदार कधीच झालो नव्हतो’; फेरी बोटचालकांच्या जीवनातली थरारक दुर्घटना

Gateway boat Accident : मुंबईत अरबी समुद्रात झालेल्या फेरी बोट दुर्घटनेतील पीडितांच्या मदतीसाठी धावलेले काही बोटचालक जेव्हा उलटलेल्या बोटीजवळ पोहोचले तेव्हा तेथील गोंधळाचे दृश्य पाहून आवाक झाले.
‘अशा भयानक घटनेचे साक्षीदार कधीच झालो नव्हतो’; फेरी बोटचालकांच्या जीवनातली थरारक दुर्घटना
एक्स
Published on

मुंबई : मुंबईत अरबी समुद्रात झालेल्या फेरी बोट दुर्घटनेतील पीडितांच्या मदतीसाठी धावलेले काही बोटचालक जेव्हा उलटलेल्या बोटीजवळ पोहोचले तेव्हा तेथील गोंधळाचे दृश्य पाहून आवाक झाले. दुर्घटनाग्रस्त बोटीतील लोक भयभीत होऊन मदतीसाठी ओरडत होते, तर काही रडत होते. असं भयानक दृश्य आम्ही कधीच पाहिले नव्हते, असे मदतीसाठी धाऊन आलेल्या इतर बोटीच्या चालकांनी सांगितले.

नौदलाच्या स्पीड बोटीने नियंत्रण गमावले आणि मुंबईजवळ करंजा येथे ‘निलकमल’ नावाच्या प्रवासी फेरीला धडक दिली. यात १४ लोकांचा मृत्यू झाला तर ९९ जणांना वाचवण्यात यश आले, असे नाविक दलाने सांगितले.

मुंबई पोर्ट ट्रस्टची पायलट बोट "पूर्वा"चे चालक अरिफ बामणे म्हणाले, जेव्हा आम्ही तेथे पोहोचलो, तेव्हा परिस्थिती खूपच दुःखद आणि गोंधळलेली होती. लोक मदतीसाठी ओरडत होते, तर काहीजण रडत होते. त्यांना एक लहान मुलगी बेशुद्ध अवस्थेत दिसली, कारण तिच्या फुफ्फुसात पाणी गेले होते. चालक आणि इतर बचावकर्त्यांनी तिला श्वास घेण्यास मदत केली. हळूहळू तिचा श्वास सामान्य झाला असे त्यांनी सांगितले.

१८ वर्षांचा बोट चालवण्याचा अनुभव असलेल्या बामणे यांनी सांगितले की, त्यांनी लहान बचाव ऑपरेशन पाहिले होते, परंतु बुधवारची घटना अत्यंत भयानक आणि दुःखद होती. हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे बचाव ऑपरेशन होते. अशा शब्दांत त्यांनी या घटनेचे वर्णन केले.

बामणे म्हणाले की, एक मासेमारीचा ट्रॉलर आणि इतर काहीजण एका फेरीबोटीने त्यांच्याआधीच त्या स्थळी पोहोचले होते. आम्ही बुधवार संध्याकाळी जवाहर दीपवरून मुंबईकडे येत होते, तेव्हा कंट्रोल रूमने त्यांना दुर्घटनेची माहिती दिली. त्यांना त्वरित दुर्घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले.

आमच्या बोटीवर फक्त आम्ही चारजण होतो. परंतु इतर बोट्स येण्यापूर्वी शक्य तितक्या लोकांना वाचवण्याचा आम्ही प्रयत्न केला. मदतीसाठी ओरडणाऱ्यांमध्ये तीन ते चार परदेशी नागरिक होते. आम्ही सुमारे २०-२५ जणांना वाचवले, ज्यांना नंतर इतर नाविक दलाच्या बोटींवर नेले.

दुसऱ्या एक छोट्या पर्यटक बोटीचे चालक इक्बाल गोठेकर यांनी सांगितले की, ३.३५ वाजता एलेफंटा बेटावरून बोट निघाल्यानंतर २५ ते ३० मिनिटांत त्यांना या दुर्घटनेची माहिती मिळाली आणि ते सर्वात पहिले घटनास्थळी पोहोचले.

गोठेकर हे रायगड जिल्ह्यातील रहिवासी असून २००४ पासून बोट चालक आहेत. गोठेकर यांनी सांगितले की, उलटलेल्या फेरीवर असलेले लोक मदतीसाठी हात वर करीत होते. त्यांच्या बोटीने १६ लोकांना वाचवले आणि त्यांना सुरक्षितपणे गेटवे ऑफ इंडियावर आणले. वाचवले गेलेले लोक पोलिस चौकीला नेले गेले. माझ्या कारकीर्दीत, मी कधीच अशी घटना पाहिली नाही, असे गोठेकर यांनी दुर्घटनेचे वर्णन करतांना सांगितले.

पठाण कुटुंबातील एकाचा मृत्यू, तर एक बेपत्ता

बोट दुर्घटनेत गोव्याच्या म्हापसा येथे वास्तव्यास असलेल्या पठाण कुटुंबातील सखीना अशरफ पठाण यांचा मृत्यू झाला. या बोटीवर अशरफ पठाण, सखीना पठाण त्यांची दोन मुले आणि मृत सखीना पठाण यांची बहीण सोनाली होते. या अपघातात अशरफ पठाण त्यांचे १० महिन्यांचे लहान मूल आणि मेहुणी सोनाली बचावली, तर सखीना पठाण यांचा मृत्यू झाला आहे. मात्र, ६ वर्षांचा मुलगा जोहान पठाण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती मिळते.

logo
marathi.freepressjournal.in