घाटकोपरमध्ये मृत्यूची दरड! ७ ठार, ७ जखमी; चिराग नगर येथील चाळींवर कोसळले महाकाय दगड; पहाटे ३.४८ वाजता काळाचा घाला

भल्या पहाटे सुमारे पावणेचारवाजता सारे साखर झोपेत असतानाच घाटकोपर चिराग नगरच्या अशोक नगर येथील चाळींवर महाकाय दरड कोसळली आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. अनेक संसार उद्धवस्त झाले. टेकडीवरून दरड, मोठाले दगड आणि पिंपळाचे झाड खालील वस्तीवर कोसळल्याने चाळीतील काही खोल्या अक्षरशः दगड-मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या.
घाटकोपरमध्ये मृत्यूची दरड! ७ ठार, ७ जखमी; चिराग नगर येथील चाळींवर कोसळले महाकाय दगड; पहाटे ३.४८ वाजता काळाचा घाला
Published on

मुंबई : भल्या पहाटे सुमारे पावणेचारवाजता सारे साखर झोपेत असतानाच घाटकोपर चिराग नगरच्या अशोक नगर येथील चाळींवर महाकाय दरड कोसळली आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. अनेक संसार उद्धवस्त झाले. टेकडीवरून दरड, मोठाले दगड आणि पिंपळाचे झाड खालील वस्तीवर कोसळल्याने चाळीतील काही खोल्या अक्षरशः दगड-मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून दुदैवी घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला; तर सात जण जखमी झाले.

पहाटेचा अंधार, पाऊस, त्यात अरुंद गल्ल्यांमुळे बचावकार्यात मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागला. मुंबई अग्निशमन दल, एनडीआर एफचे जवान आणि वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यात मोठी कसरत करावी लागली. घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत मानवी साखळी करुन ढिगारा उपसण्याचे काम पूर्ण करण्यात आले.

घाटकोपर पश्चिम चिराग नगर अशोक नगर टेकडी क्रमाक ३च्या गौशिया चाळीतील तीन ते चार घरांवर मंगळवारी मध्यरात्री दरड कोसळली.    भला मोठा आवाज झाल्याने सर्वांनी घराबाहेर धाव घेतली. टेकडीखाली असलेल्या तीन ते चार घरांवर मोठमोठे दगड, चिखल आणि झाड कोसळले व घरातील अनेकजण दबले गेले.

घटनेची माहिती कळताच स्थानिकांनी त्वरीत पोलिसांना आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली. या दोन्ही यंत्रणा घटनास्थळी येईपर्यंत आसपासच्या लोकांनी धाव घेत बचावकार्य सुरु केले. रिमझिम पावसात मोठ्या दरडी बाजूला करत बचावकार्य सुरू असताना अनेक अडचणी येत होत्या. जवळपासच्या काही घरांमधील स्थानिकांना अन्य घरांमध्ये आसरा देण्यात आला. यावेळी सारेच प्रचंड भितीच्या छायेखाली होते.

आधीच दिल्या होत्या सूचना

दरम्यान, हा परिसर दरड कोसळण्याच्या दृष्टीने संवेदनशील असून पावसाळ्यात नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या होत्या, असे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे टेकडीवरील माती आणि खडकांमध्ये पाणी मुरले. त्यामुळे मातीचा तसेच खडकांचा आधार कमकुवत होऊन दगड कोसळण्यासह मोठे झाड उन्मळून पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

जणू भूकंपच झाला

‘गाढ झोपेत असतानाच    मोठा आवाज आला आणि झोपेतून जागे होत आम्ही घराबाहेर पळ काढला. असा आवाज आला की जणू भूकंपच झाला की काय असे वाटू लागले. मात्र दरड कोसळल्याची माहिती मिळताच माझ्यासह चाळीतील अनेकांनी बचावकार्यासाठी घटनास्थळी धाव घेतली’, अशी माहिती येथील स्थानिक रहिवासी फिरोज अन्सारी यांनी दिली.

२४९ ठिकाणी दरडींची टांगती तलवार

  • ७४ धोकादायक, तर ४६ ठिकाणे अतिधोकादायक

  • एस वॉर्डमध्ये सर्वाधिक ११६ ठिकाणे

  • उपाययोजनांसाठी ३२५ कोटींची तरतूद

मृतांमध्ये संपूर्ण कुटुंबाचा समावेश

दरडप्रवण टेकडीच्या पायथ्याशी असलेली घरे या दुर्घटनेत सर्वाधिक बाधित झाली. टेकडीच्या वरच्या भागातील दगड-मातीचा मोठा ढिगारा वेगाने खाली आल्याने घरांवर थेट कोसळला. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका संपूर्ण कुटुंबाचा समावेश आहे. हे कुटुंब अवघ्या चार दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशातून मुंबईत आले होते. तसेच आपल्या विधवा आईला कुटुंबाचा खर्च भागविण्यासाठी मदत करणाऱ्या एका तरुणाचाही मृतांमध्ये समावेश असल्याची माहिती आहे. जखमी आणि मृतांना राजावाडी रुग्णालय तसेच कुर्ला येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले.  ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

मृतांच्या वारसाला ४ लाखांची मदत

घाटकोपर पश्चिम येथील चिराग नगर अशोक नगर येथे डोंगरउतारावरील माती आणि ढिगाऱ्याचा काही भाग घरांवर कोसळल्याने घडलेल्या दुर्घटनेची माहिती मिळताच महापौर रितू तावडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची प्रत्यक्ष पाहणी केली. उपस्थित सर्व यंत्रणांना मदत कार्य अधिक वेगाने व योग्य समन्वय साधून पार पाडण्याचे निर्देश दिले. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या वारसाला ४ लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत तर जखमी झालेल्या प्रत्येकाला वैद्यकीय उपचारासाठी ५० हजार रुपयांची वैद्यकीय मदत देण्याची घोषणा महापौर रितू तावडे यांनी केली. दुर्घटना घडली ती जागा आणि तेथे पोहोचण्याचा मार्ग हा फक्त एक व्यक्ती जावू शकेल, इतका अरुंद असल्याचे महापौर तावडे यांनी सांगितले.

मृतांची नावे :

मोहम्मद अन्सारी (१४), साहिल काझी (१९), अज्ञात व्यक्ती (४५), अबान शेख (२), मन्नत शेख (४), मर्जिना शेख (२७), विकेत यादव (२७). g जखमींची नावे : सोहेल अन्सारी (१८), नईमुद्दीन इक्बाल खान (२८), साजिद अन्सारी (१६), फराना खान (२८), दिलबर खान (३८), शमिन खान (२६).

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in