सोशल मीडियावर दररोज तरुण जोडप्यांचे समुद्रकिनारी फिरतानाचे, सुर्यास्ताचा आनंद घेतानाचे व्हिडीओ पाहायला मिळतात. मात्र अलीकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो आयुष्यभराच्या साधेपणाचे, प्रेमाचे आणि आनंदाचे अप्रतिम उदाहरण ठरला आहे.
इंस्टाग्रामवर दिव्या तावडे (@shortgirlthingss) हिने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तिचे आजी-आजोबा पहिल्यांदाच समुद्रकिनारा पाहताना दिसत आहेत. हा क्षण गमतीशीर नसून अत्यंत शांत, हृदयस्पर्शी आणि भावनिक आहे.
व्हिडिओमध्ये दिसते की, समुद्राच्या लाटा त्यांच्या पायांना स्पर्श करतात. हा अनुभव आजीला नवीन असल्याने ती आजोबांचा हात घट्ट धरते. या व्हिडिओमध्ये, आजीने केशरी लुगडं, हिरव्या बांगड्या, कपाळावर लाल कुंकू अशी वेशभूषा केली आहे, तर आजोबांनी पांढऱ्या धोतरासह सदरा आणि पारंपरिक टोपी घातली आहे.
हातात हात अन् समुद्राला नमस्कार
दिव्याने व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे, "ही सहल सुट्टीसाठी नव्हती, तर आयुष्यभर फक्त ऐकलेल्या समुद्राला प्रत्यक्ष पाहण्याची त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी होती." व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो, दोघेही सावकाश पाण्यात पावलं टाकत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर मोठा उत्साह नाही, पण समाधान, स्मितहास्य आणि एकमेकांकडे टाकलेले प्रेमळ कटाक्ष हेच दोघांच्या आनंदाचे प्रतीक आहे. व्हिडिओमध्ये, एका क्षणी ते हातात हात घेऊन समुद्राला नमस्कार करतात, हा साधा पण श्रद्धेने भरलेला क्षण अनेकांना भावनिक करतो.
व्हिडीओने जिंकले नेटकऱ्यांचे मन
व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिली. एका युजरने लिहिले, "यासाठीच इंटरनेट बिल भरतो. मन भावूक आणि आनंदी झाले." तर दुसऱ्याने म्हटले, "तिच्या आवडत्या हिरोसोबत सूर्य आणि समुद्राचा आनंद." अनेकांनी म्हटले की, "ज्या पद्धतीने त्यांनी एकमेकांचा हात धरलाय, ते खूप सुंदर आहे."
हा व्हिडिओ डिजिटल जगात साध्या आनंदाची, आयुष्यभराच्या सोबतीची आठवण करून देतो. आनंद नेहमी लक्झरीतच मिळतो असं नाही, तर एखादी छोटी इच्छा पूर्ण करण्यात आणि ती आयुष्यभराच्या जोडीदारासोबत शेअर करण्यातही सापडतो, हेच या व्हिडीओनं दाखवून दिलं आहे.